भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) महत्त्वाकांक्षी अभियान असलेल्या मंगळयानाने आपला निम्मा प्रवास पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे पृथ्वी आणि मंगळ एकाच कक्षेत येण्याच्याच दिवशी मंगळयानाने हा निम्मा प्रवास केला आहे.
मंगळयानाने बुधवारी ३३७ दशलक्ष किमीचा प्रवास पूर्ण केला. सकाळी दहाच्या सुमारास यानाकडून इस्रोला संदेश प्राप्त झाला. यानाकडून संदेश प्राप्त होण्यासाठी सव्वाचार मिनिटे लागतात. मंगळयानाने निम्मा प्रवास पूर्ण केल्याने ही मोहीम यशस्वी होण्याच्या मार्गावर असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.
 मंगळयानाने गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरला मंगळाकडे आपला प्रवास सुरू केला आहे. यंदा सप्टेंबरमध्ये ते मंगळावर पोहोचेल. मंगळयानाच्या प्रवासावर इस्रो बारीक लक्ष ठेवून आहे. मंगळयानावर ट्रॅजेक्टरी मिशन मॅनोव्हर (टीसीएम) लावण्यात आले असून उत्तम गतीमुळे यातील दुसऱ्या क्रमांकाचा टीसीएम कार्यान्वित करण्याची गरज नसल्याचे इस्रोने स्पष्ट केले.
यापुढील टीसीएम आता जूनमध्ये कार्यान्वित होईल. ४५० कोटी रुपये खर्चाच्या मंगळ अभियानाचे लक्ष्य मंगळ ग्रहावरील मिथेन वायूचा अभ्यास करणे हे आहे. जगभरातून आतापर्यंत ५१ मंगळमोहिमा आखण्यात आल्या असून त्यापैकी २१ यशस्वी ठरल्या आहेत. भारताची मंगळमोहीम यशस्वी ठरल्यास इस्रो रशिया, अमेरिका आणि युरोप यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे.