फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी राफेल फायटर विमानांच्या खेरदी व्यवहारासंबंधी केलेल्या महत्वपूर्ण खुलाशानंतर देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनिल अंबांनी यांच्या रिलायन्स डिफेन्सला मदत केल्याच्या आरोपावरुन काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. याच पार्श्वभूमीवर फ्रान्सवा ओलांद यांची मुलाखत घेणारा पत्रकार अँटटॉन रोयुगेट यांच्याशी इंडिया टुडेने संवाद साधला.

त्यावेळी त्याने भारत सरकारकडून या संपूर्ण डीलसंबंधी चुकीची माहिती देण्यात येत असल्याचे सांगितले. रिलायन्स डिफेन्स आणि डसॉल्ट एव्हिशनमध्ये झालेल्या कराराशी भारत आणि फ्रान्स सरकारचा संबंध नाही ही भारताकडून देण्यात येणारी माहिती चुकीची आहे असे रोयुगेट यांनी सांगितले. मीडियापार्ट या प्रसारमाध्यमासाठी रोयुगेट यांनी ओलांद यांची मुलाखत घेतली.

भारत सरकारनेच राफेल करारासाठी रिलायन्स डिफेन्सच्या नावाची शिफारस केली होती असे ओलांद यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे रोयुगेट म्हणाले. भारत सरकारने फ्रान्सबरोबर राफेल फायटर विमानांच्या खेरदीचा  व्यवहारावर स्वाक्षरी केली त्यावेळी फ्रान्सवा ओलांद फ्रान्सचे राष्ट्रपती होते. भारत सरकारनेच सर्व्हीस ग्रुप म्हणून रिलायन्स डिफेन्सच्या नावाची शिफारस केली. डसॉल्ट एव्हिशनने पुढे त्यांच्या बरोबर चर्चा केली.

आमच्यासमोर पर्याय नव्हता. जे आम्हाला सांगण्यात आले तसेच आम्ही केले. त्यामुळे या समूहकाडून मला काही फेव्हर मिळण्याचा प्रश्नच येत नाही. ज्युली गायेटच्या चित्रपटाशी राफेल डिलचा काही संबंध असण्याची मी कल्पनाच करु शकत नाही असे ओलांद म्हणाले.

भारत सरकारकडून कोणताही पर्याय देण्यात आला नव्हता असे ओलांद यांनी तुम्हाला सांगितले. पर्याय का देण्यात आला नाही ? त्यामागे काय कारणे होती ? त्याबद्दल त्यांनी तुम्हाला काही सांगितले का ? या प्रश्नावर रोयुगेट म्हणाले कि, पर्याय न देण्यामागे भारत सरकारचा काय उद्देश होता याबद्दल त्यांनी काही सांगितले नाही. त्यांना सुद्धा उद्देश माहित असेल असे वाटत नाही. राफेल करार महत्वाचा असल्याने फ्रान्सनेही भारताची विनंती मान्य केली.

ओलांद यांच्या पार्टनर ज्युलि गायेट यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाला अनिल अंबांनी यांच्या कंपनीने अर्थसहाय्य केल्याचा आरोप होत आहे. तुम्हाला तुमच्या तपासामध्ये काय हाती लागले ते तुम्ही सांगू शकाल का ? गायेट यांच्या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये थेट रिलायन्स डिफेन्सने गुंतवणूक केलेली नाही. एका फ्रेंच व्यक्तीनेच गुंतवणूक केली आहे जो अंबानींना मागच्या २५ वर्षांपासून ओळखतो. चित्रीकरणाच्या पूर्वसंध्येला खूप उशिरा चित्रपटाला अर्थसहाय्य करण्यात आले. चित्रपटाच्या एकूण बजेटच्या ही १६ टक्के गुंतवणूक आहे असे रोयुगेट यांनी सांगितले.

Story img Loader