Donald Trump on Indian Tarrif on US : अमेरिकेतून भारतात निर्यात होणाऱ्या कारवर ७० टक्क्याहून अधिक कर असल्याने अमेरिकेसाठी ती एक मोठी समस्या आहे. त्यामुळे भारतासोबतची अमेरिकेची व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी तेल आणि वायूची विक्री करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून ते तेथे विविध नेत्यांची भेट घेत आहेत. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. या पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प म्हणाले, पंतप्रधान मोदींनी चांगल्या श्रद्धेने भारताच्या अन्याय्य आणि अतिरिक्त शुल्कामध्ये कपात करण्याची घोषणा केली. जी एक मोठी समस्या आहे, असे मी म्हणायलाच हवे. भारत अनेक वस्तूंवर ३०, ४०, ६० आणि अगदी ७० टक्के कर लादतो. काही प्रकरणांमध्ये तर त्याहूनही जास्त. उदाहरणार्थ, भारतात येणाऱ्या अमेरिकन कारवर ७० टक्के कर लावल्याने त्या कार विकणे जवळजवळ अशक्य होते. आज, भारतासोबत अमेरिकेची व्यापारी तूट जवळजवळ १०० अब्ज डॉलर्स आहे आणि पंतप्रधान मोदी आणि मी सहमत झालो आहे की आपण दीर्घकाळापासून चालत आलेली असमानता दूर करण्यासाठी वाटाघाटी करू”. असे ट्रम्प यांनी भारत-अमेरिका ब्रीफिंगमध्ये सांगितले.

“आम्ही तेल आणि वायू, एलएनजीच्या विक्रीद्वारे तूट सहजपणे भरून काढू शकतो. कारण जगातील इतर देशांपैकी आमच्याकडे एलएनजी उत्पादने सर्वाधिक आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिकेने ऊर्जेबाबत एक महत्त्वाचा करार केला आहे जो अमेरिका भारताला तेल आणि वायूचा प्रमुख पुरवठादार म्हणून पुनर्संचयित करेल.

भारत कायद्यांमध्ये सुधारणा करणार

“भारतीय बाजारपेठेत सर्वोच्च स्तरावर अणु तंत्रज्ञानासाठी अमेरिकेचे स्वागत करण्यासाठी भारत आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा करत आहे. यामुळे लाखो भारतीयांना सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणारी वीज मिळेल आणि भारतातील अमेरिकन नागरी अणु उद्योगाला अब्जावधी डॉलर्स मिळतील,” असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias tariffs a big problem us sale of oil gas will bridge trade deficit trump sgk