आर्थिक निकषांवर भारतातील शहरांनी चांगली कामगिरी केली आहे, पण राहणीमान आणि पर्यावराच्या निकषांवर या शहरांची कामगिरी ही तुलनेने कमकुवत आहे असं मत ऑक्सफर्ड ग्लोबल इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२६ मध्ये मांडण्यात आलं आहे. या इंडेक्समध्ये जगातल्या एक हजार सर्वात मोठ्या शहरांमध्ये भारतातील ९१ शहरांचा समावेश आहे.
ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये काय म्हटलं?
ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२६ भारतातील सर्वाधिक क्रमांक मिळवणाऱ्या १० शहरांमध्ये राहणीमान आणि पर्यावरणाच्या त्रुटी दिसून आल्या आहेत. आर्थिक निकष आणि मानवी कौशल्य या निकषांवर ही शहरं चांगली आहेत, पण राहणीमान आणि पर्यावरण यांच्या समस्या या शहरांमध्ये आहेत. भारतातल्या या दहा शहरांचा समावेश जगातल्या पहिल्या ५०० शहरांमध्ये करण्यात आला आहे. Livemint ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
दिल्लीबाबत या इंडेक्समध्ये काय म्हटलं आहे?
दिल्ली या शहरांच्या यादीत अग्रक्रमावर आहे. जागतिक क्रमवारीत दिल्लीने २६८ वा क्रमांक मिळवला आहे. मानवी कौशल्य याबाबत दिल्लीने १३ वं स्थान मिळवलं आहे तर आर्थिक निकष या मुद्द्यावर ११६ वे स्थान मिळवले आहे. दहा भारतीय शहरांमध्ये दिल्लीचा क्रमांक पहिला आहे. मात्र राहणीमानाच्या निकषावर दिल्ली ७८१ व्या स्थानावर आहे तर पर्यावरणाच्या निकषांवर दिल्ली ९१५ व्या स्थानावर आहे. पर्यावरणाच्या बाबतीत दिल्लीची कामगिरी कमकुवत ठरली आहे.
बंगळुरू आणि मुंबईची कामगिरी कशी आहे?
बंगळुरूने या यादीत ३११ वा क्रमांक मिळवत भारतात दुसरा क्रमांक मिळवला आहे. आर्थिक निकषांच्या आघाडीवर बंगळुरू १७६ व्या स्थानी तर मानवी कौशल्यांच्या निकषांवर १०६ व्या स्थानी आहे. पण राहणीमानाचा निकष क्रमांक ७७५ इतका खालावला आहे तर पर्यावरणाच्या निकषाबाबत बंगळुरू ५२८ व्या स्थानी आहे. मुंबईचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. मुंबईने एकूण क्रमवारीत ३३० वं स्थान मिळवलं आहे. आर्थिक निकषांच्या बाबतीत मुंबई १७० व्या क्रमांकावर तर मानवी कौशल्यांच्या बाबतीत मुंबईत ७७ व्या स्थानी राहिली आहे. पण राहणीमानाच्या बाबतीत मुंबई ८१७ व्या क्रमांकावर आणि पर्यावरणाच्या बाबतीत ७८२ व्या क्रमांकावर राहिली आहे.
चेन्नई आणि हैदराबादबाबत इंडेक्समध्ये काय उल्लेख?
चेन्नई हे शहर एकूण क्रमवारीत ३८१ व्या क्रमांवकर आर्थिक निकषांवर २६३ व्या स्थानी, तर मानवी कौशल्यांच्या बाबत १२२ व्या स्थानी आहे. पण राहणीमानासाठी चेन्नई ८५४ व्या स्थानावर तर पर्यावरणाबाबत चेन्नई ६३३ व्या स्थानी राहिली आहे. हैदराबादने एकूण क्रमवारीत ४२१ वा क्रमांक मिळवला आहे, आर्थिक निकषांबाबत हैदराबाद २४८ व्या स्थानी आहे, तर मानवी कौशल्यांच्या बाबतीत हैदराबाद २४१ व्या स्थानी आहे. पर्यावरणाच्या निकषांबाबत हैदराबाद ६५७ व्या स्थआनी आहे तर राहणीमानाच्या बाबतीत हैदराबाद ८१८ व्या स्थानी आहे.
