IndiGo Flight Chennai Singapore AC Pilot Issue: चेन्नईहून सिंगापूरसाठी उड्डाण करणाऱ्या इंडिगोच्या विमानात २०० प्रवाशांना धक्कादायक अनुभवाचा सामना करावा लागला. उड्डाणाच्या निश्चित वेळाहून पुढे पाच तास प्रवाशांना विमानातच बसून राहावे लागले. या प्रकरणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून २४ फेब्रुवारी रोजी इंडिगोचे 6E 1025 हे विमान सकाळी ७.२० मिनिटांनी उड्डाण घेणार होते. मात्र उड्डाणासाठी जवळपास पाच तासांचा उशीर झाला. ११ वाजून ३९ मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले.

इंडिगोने काय कारण दिले?

तब्बल पाच तास प्रवाशी रनवेवर ताटकळत राहिल्यानंतर इंडिगोच्या विरोधात नाराजीचा सूर उमटला. यानंतर इंडिगोने अधिकृत निवेदन देत घटनेबद्दल भाष्य केले. चेन्नईमधील तापमान वाढल्याचा परिणाम विमानावर झाला होता. केबिन आणि विमानातील तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक होते. यासाठी विमानातील एअर कंडीशनिंगमध्ये दुरूस्ती करण्यासाठी विमान थांबविण्यात आले. इंजिनिअर येऊन विमान दुरूस्त करण्यासाठी वेळ गेला. एसी दुरूस्त केल्यानंतर आणखी एक समस्या उद्भवल्यामुळे उड्डाणास उशीर झाला.

एअर कंडीशनिंगची दुरूस्ती होत असताना जर विमानात उपस्थित असलेल्या क्रूने उड्डाण घेतले असते तर फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) चा नियम लागू झाला असता. या नियमानुसार कॉकपिट क्रू सदस्यांना निर्धारित वेळेपेक्षा अधिक काम करण्याची परवानगी नाही. यामुळे इंडिगोला चेन्नई ते सिंगापूर प्रवास करणाऱ्या विमानासाठी नव्या कॉकपिट क्रूचा बंदोबस्त करावा लागला. यामुळे विमानाला उड्डाणासाठी आणखी उशीर झाला.

विमानात घुसमट होत असल्याची प्रवाशांची तक्रार

सोशल मीडियावर एका मिनिटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रवाशी विमानात घुसमट होत असल्याची तक्रार करत आहेत. विमानातील एसी चालू-बंद होत असल्यामुळे अनेकांना श्वास घेण्यातही अडचण येत होती. तसेच विमानाच्या दाराजवळ उभ्या असलेल्या सीआयएसएफ जवानांशीही प्रवाशी हुज्जत घालताना दिसून येत आहेत.

एका प्रवाशाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “७.३० च्या विमानासाठी आम्हाला सकाळी ६.३० वाजता बोर्ड करण्यात आले. मात्र ठरलेल्या वेळेनुसार विमानाने उड्डाण घेतले नाही. तसेच विमानास उशीर का होत आहे, याचीही कोणतीही माहिती आम्हाला देण्यात येत नव्हती. विमानातील एसीही सारखा बंद चालू होत होता. विमानात लहान मुले, वृद्ध प्रवाशी उपस्थित होते. आमची घुसमट होत असून आम्हाला विमानातून खाली उतरवा, अशी विनंती करूनही आमच्या मागणीकडे लक्ष दिले गेले नाही.”