scorecardresearch

दिल्ली-देवघर इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची माहिती, विमानतळावर खळबळ, अचानक लखनौमध्ये…

इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विमान लखनौला वळवण्यात आलं. लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

IndiGo Delhi Deogarh flight emergency landing
दिल्ली-देवघर इंडिगो विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. (प्रातिनिधिक फोटो – Indian Express)

दिल्लीवरून देवघरला (झारखंड) जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे विमान लखनौला वळवण्यात आलं. दिल्लीवरून निघालेल्या या इंडिगो विमानाचा नंबर ६-ई ६१९१ असा आहे. या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर या विमानाचं लखनौ विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या प्रकरणाची माहिती देताना इंडिगोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, “सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून विमान लखनौ विमानतळावर उतरवण्याची परवानगी देण्यात आली. आम्ही सुरक्षा यंत्रणांच्या नियमांचे पालन करत आहोत.”

लनखौमधील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने याबाबत सांगितले की, हे विमान दुपारी १२.२० वाजता विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. त्यानंतर हे विमान आयसोलेशनमध्ये नेण्यात आलं. विमानतळावरीस सुरक्षा यंत्रणेने विमानाची पूर्ण तपासणी केली. तपासानंतर कळलं की, ही केवळ अफवा होती. त्यानंतर हे विमान लखनौवरून देवघरसाठी रवाना करण्यात आलं.

हे ही वाचा >> महिला IAS-IPS अधिकाऱ्यांमधला वाद चव्हाट्यावर, आधी खासगी फोटो शेअर केले आता भ्रष्टाचाराचे आरोप

गेल्या महिन्यात गुजरातमध्ये झालेली इमर्जन्सी लँडिंग

याआधी गेल्या महिन्यात १० जानेवारी रोजी गुजरातमधील जामनगर एअरपोर्टवर गोव्याला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं. ही फ्लाईट मॉस्कोवरून गोव्याला जात होती. या फ्लाईटमध्ये एकूण २३६ प्रवासी प्रवास करत होते. या सर्व प्रवाशांना आधी विमानातून बाहेर काढण्यात आलं. विमानाची संपूर्ण तपासणी करून प्रवाशांना गोव्याला पाठवण्यात आलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 17:46 IST
ताज्या बातम्या