एखाद्या विमान कंपनीत काम करणं हे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण तरुणी त्या दृष्टीने वाटचाल करत असतात. पण अशा कर्मचाऱ्यांना अपमान सहन करावा लागला तर? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे इंडिगोतल्या महिला कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर केलेली पोस्ट. काही आठवड्यांपूर्वी इंडिगो या नावाजलेल्या विमान कंपनीतली ग्राऊंड स्टाफची नोकरी सोडल्यानंतर एका महिला कर्मचाऱ्याने व्हिडीओ पोस्ट केला आहे. ड्रीम जॉब असणारी नोकरी मी सोडली आणि मी स्वाभिमान निवडला असं या महिलेने म्हटलं आहे. पायल दास असं या महिलेचं नाव आहे. तिने केलेली व्हिडीओ पोस्ट व्हायरल झाली आहे.

पायल दास या महिलेने सोडली इंडिगोची नोकरी

बंगळुरू या ठिकाणी इंडिगो कंपनीत कार्यरत असलेल्या पायल दासने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ ती इंडिगोत असतानाचा आहे. तिने इंडिगोमधली नोकरी सोडली. याबाबत तिने हे सांगितलं की महिन्याभरापूर्वीच तिने राजीनामा दिला आणि १७ जुलै हा तिच्या कामावरचा शेवटचा दिवस होता. पायल म्हणते आज १७ जुलै आहे. माझ्या कामावरचा म्हणजेच इंडिगोमधला आजचा माझा शेवटचा दिवस आहे.

पायलने का सोडली इंडिगोची नोकरी?

पायल दास या तरुणीने नोकरी सोडली याचं कारणही तिने दिलं. पायल म्हणते, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी मला कायम सहकार्य केलं. मला कधीही त्रास दिला नाही. पण चांगल्या ठिकाणी वाईट गोष्टीही असतात. सतत होणाऱ्या अपमानापेक्षा मी स्वाभिमान निवडला. आपल्याला पैशांची गरज असते म्हणून मी नोकरी करत होते. पण या ठिकाणी सततचा अपमान होत होता त्यामुळे वैतागून गेले. ज्या ठिकाणी आपला सन्मान केला जात नाही अशा ठिकाणी आपण आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नये या मताची मी आहे. त्यामुळेच मी राजीनामा दिला. अनेक तरुणींप्रमाणे इंडिगो मध्ये काम करणं हे माझ्यासाठीही स्वप्न होतं. माझं हे स्वप्न पूर्णही झालं. पण कंपनीत काम करायला सुरुवात केल्यानंतर मला इथलं वास्तव समजलं. बाहेरुन वाटणारा ड्रीम जॉब आणि कंपनीत सहन करावे लागणारे अपमान, चुकीची वागणूक या गोष्टी आपल्याला जमिनीवर आणतात. त्यामुळेच मी ही नोकरी सोडली असं पायल दासने म्हटलं आहे.

तीन वर्षांमध्ये मी मानसिक छळच सहन केला-पायल

पायल म्हणाली, मी तीन वर्षे इंडिगोमध्ये काम केलं. या तीन वर्षांमध्ये मला मानसिक त्रास देण्यात आला. शिवाय सतत अपमान करण्यात येत होता. त्यामुळे अखेर मी कंटाळून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. ही कंपनी माझ्यासाठी योग्य नाही हेच मला जाणवलं. आपण आपल्या कंपनीला आपला वेळ, आपलं सर्वस्व देतो. त्या बदल्यात ते आपल्याला पगार देतात. मात्र सन्मान आणि स्वाभिमानाचं काय? कारण तो देखील महत्त्वाचा. एखाद्या ठिकाणी फक्त पैसे मिळतात म्हणून थांबला असाल तर तुम्हीही अशी नोकरी सोडून द्या असं आवाहन पायलने केलं आहे.

पायलच्या पोस्टवर नेटकरी काय म्हणाले?

पायलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक युजर म्हणतो तू जे मांडलंस ते कॉर्पोरेट कंपन्यांमधलं वास्तव आहे. तुला आलेला अनुभव अनेकांना आला असेल. दुसरा नेटकरी म्हणतो तुला आणखी चांगली नोकरी मिळेल काळजी करु नकोस. तिसरा नेटकरी म्हणाला, बरं झालं तू नोकरी सोडली, जिथे अपमान होतो तिथे थांबायचं नाहीच. असं म्हणत नेटकऱ्यांनी या पोस्टवर रिप्लाय केले आहेत.