IndiGo fined by DGCA: डिसेंबर २०२५ मध्ये ३ ते ५ डिसेंबर दरम्यान इंडिगोच्या ढिसाळ नियोजनामुळे विमान सेवेचा बोजवारा उडाला होता. देशभरातील अनेक विमानतळावरील हजारो विमानांचे उड्डाण रद्द झाले होते. ज्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळांवर खोळंबले होते. यानंतर आता महिन्याभराने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोला दणका देत २२.२० कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे.
डिजीसीएने शनिवारी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले की, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला. एअरलाइनच्या ऑपरेशनल त्रुटींचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
३ ते ५ डिसेंबर दरम्यान झालेल्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्यानंतर महिन्याभराने ही कारवाई करण्यात आली आहे. या तीन दिवसांत इंडिगोची दोन हजारांहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तर दीड हजारांहून अधिक विमानांना कमालीचा विलंब झाला होता.
देशातील ६० टक्क्यांहून अधिक देशांतर्गत हवाई प्रवाशांची वाहतूक इंडिगो कंपनीच्या माध्यमातून होते. या गोंधळाला नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियम जबाबदार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते. या नियमामुळे क्रूची टंचाई निर्माण झाली होती.
डिजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले की, ३ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान मेसर्स इंडिगोच्या विमान वाहतुकीमध्ये व्यापक अडचणी आल्यानंतर २,५०७ उड्डाणे रद्द झाली तर १,८५२ उड्डाणांना विलंब झाला. विविध विमानतळांवर अडकून पडलेल्या तीन लाखांहून अधिक प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली.
दंड लादल्यानंतर इंडिगोची प्रतिक्रिया
डीजीसीएच्या दंडानंतर इंडिगोने म्हटले की, या निर्देशांची आम्ही दखल घेऊ आणि त्यानुसार योग्य ती पावले उचलू. तसेच डिसेंबरमध्ये आलेल्या व्यत्ययानंतर इंडिगोमधील अंतर्गत प्रक्रियेला सशक्त करणे आणि त्यात लवचिकता आणण्याबद्दल आढावा सुरू आहे. जेणेकरून आमच्या १९ वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीतील अनुभवातून आम्ही चांगली सेवा देऊ.
