नवी मुंबईहून श्रीनगरला पोहोचलेल्या इंडिगोच्या विमानाचा श्रीनगर विमानतळावर उतरल्यानंतर एक अपघात झाला. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास विमान पार्किंग क्षेत्रात लावत असताना धावपट्टीजवळील ‘व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टीम’च्या (VDGS) पोलला जाऊन धडकले. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

नवी मुंबईहून श्रीनगरला गेलेल्या इंडिगोच्या विमानाचा श्रीनगर विमानतळावर उतरल्यानंतर मोठा अपघात टळला. सकाळी ९ च्या सुमारास विमान पार्किंगमध्ये उभे करत असताना हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही.

इंडिगोचे ‘६ई २२५’ (VT-NOG) हे विमान नवी मुंबईहून उड्डाण करून श्रीनगर विमानतळावर पोहोचले होते. बे नंबर ६ वर विमान पार्क करत असताना, विमानाचा पुढील भाग (नोझ) थेट ‘व्हिज्युअल डॉकिंग गायडन्स सिस्टिम’च्या (VDGS) खांबाला जाऊन धडकला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) दिलेल्या माहितीनुसार, या धडकेमुळे विमानाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेनंतर तातडीने सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अपघातामुळे विमानतळावरील इतर विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व उड्डाणे आणि विमानतळाचे काम पूर्ववत सुरू आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबतची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या घटनेबाबतची अधिक माहिती गोळा केली जात असून, अधिक तपशिलांसाठी हे वृत्त अपडेट केले जात आहे.