एका प्रवाशाच्या गैरसमजुतीतून निर्माण झालेल्या गोंधळामुळे मंगळुरू-मुंबई विमानाने सहा तास उशिरा उड्डाण केले. १४ ऑगस्टला रविवारी कर्नाटकातील मंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. सहप्रवाशाच्या फोनमध्ये संशयास्पद संदेश वाचल्यानंतर दुसऱ्या एका प्रवाश्याने याबाबत विमानाच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर ताबडबोड विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या संपूर्ण विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यात काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

‘तीन तासांत ठार करणार’; मुकेश अंबानी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

मंगळुरू विमानतळावरून एक प्रवासी मुंबईला जाण्यासाठी विमानात बसला होता. हा प्रवासी बंगळुरु विमानतळावरून प्रवासाच्या तयारीत असलेल्या आपल्या मैत्रिणीशी चॅट करत होता. यावेळी ‘१४ बी’ या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीला हा प्रवासी संशयास्पद चॅट करत असल्याचे लक्षात आले. ‘यू आर द बॉम्बर’ असा संदेश मोबाईलच्या स्क्रीनवर वाचताच सहप्रवाश्याने विमानातील कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. हे तरुण-तरुणी गमतीत अशाप्रकारचे संभाषण करत होते. घातपाताच्या अनुशंगाने या विमानाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. या प्रकारामुळे मंगळुरू विमानतळावर हे इंडिगोचे विमान सहा तास रखडले. गमतीतून सुरू झालेल्या या प्रकाराचा प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

इंडिगो विमान कंपनीच्या तक्रारीनंतर याप्रकरणी बाजपे पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या ५०५ १ बी, सी या कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयास्पद संभाषण करणाऱ्या व्यक्तीची अनेक तास चौकशी करण्यात आली. या व्यक्तीला विमान प्रवास देखील नाकारण्यात आला. तर दुसरीकडे मंगळुरू विमानतळावरील या व्यक्तीच्या मैत्रिणीची फ्लाईट देखील चुकली.

निष्काळजीपणाचा कळस! विमानातल्या जेवणात सापाचं डोकं, पाहा VIRAL VIDEO

दरम्यान, इंडिगोच्या या विमानातील सर्व १८५ प्रवाशांच्या सामानाची विमानतळाच्या कर्मचाऱ्यांकडून कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.