IndiGo Flight emergency door incident : इंडिगोच्या विमानात शनिवारी एक अत्यंत विचित्र घटना घडली. विमानाच्या लँडिंगच्या काही मिनिटे आधी एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्याची नंतर चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने धक्कादायक दावा केला. त्याला भुताने झपाटलं होतं, असं तो म्हणाला. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

बेंगळुरू ते वाराणसी दरम्यानच्या इंडिगो फ्लाइट 6E-185 ने रात्री ८:१५ च्या सुमारास उड्डाण केले होते. प्रवाशांमध्ये उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील रहिवासी मोहम्मद अदनान नावाचा व्यक्ती होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासाच्या अवघ्या १५ मिनिटांनंतर अदनानने आपत्कालीन दरवाजाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. केबिन क्रूच्या हे लक्षात येताच त्यांनी त्याला ताकीद दिली.

रात्री १०:२० च्या सुमारास, विमान वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते, तोपर्यंत अदनानचे वर्तन सामान्य होते. विमान जमिनीपासून अवघ्या ५०० फूट उंचीवर असताना अदनानने पुन्हा एकदा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबर्सनी सावध केल्यानंतर पायलटने प्रसंगावधान राखले आणि लँडिंगचा प्रयत्न रद्द केला. विमानाने हवेत पुन्हा एक घिरटी घातली (गो-अराउंड) आणि १०:३५ वाजता सुरक्षित लँडिंग झाले.

इंडिगोच्या विमानात थरार

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदनानच्या कृत्यामुळे प्रवासी प्रचंड घाबरले होते, त्यांनी सुरक्षित लँडिंगबद्दल कर्मचाऱ्यांचे आभार मानले. प्रोटोकॉलनुसार, अदनानला तात्काळ एअरलाइन सुरक्षा कर्मचारी आणि CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) च्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांना माहिती देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विमानतळावर चौकशी दरम्यान त्याने सुरुवातीला आपल्याला असे का केले हे माहित नसल्याचे सांगितले आणि नंतर दावा केला की त्याच्या अंगात “भूत शिरले होते”. पोलीस ठाण्यात विचारपूस केली असता त्याने सांगितले की, तो गोव्यातील सुटी संपवून परतत होता आणि ज्या हँडलला तो खेचत होता तो आपत्कालीन दरवाजाचा आहे, हे त्याला माहीत नव्हते.

“आमचा तपास सुरू असून आरोपीची चौकशी केली जात आहे. मऊ येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबाला माहिती देण्यात आली असून ते वाराणसीला येण्यासाठी निघाले आहेत,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.