IndiGo Flight Emergency Landing News update: कोलकाताहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे डावे इंजिन लँडिंगच्या काही वेळ आधी निकामी झाल्यामुळे, मंगळवारी उशिरा रात्री चेन्नई विमानतळावर पूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२४ प्रवासी असलेले इंडिगोचे विमान ‘6E-723’ (कोलकाता ते चेन्नई) मध्ये ११ ऑगस्ट रोजी रात्री ११.२९ वाजता पूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. हे विमान रात्री ११.३० वाजता विमानतळावर उतरणार होतं, परंतु लँडिंगची तयारी करत असताना वैमानिकाच्या लक्षात आलं की विमानाच्या डाव्या बाजूचं इंजिन निकामी झालं आहे. त्यांनी त्वरित हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली, ज्यानंतर विमानतळ प्रशासनाने विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सक्रिय केली.

विमानाने रात्री ११.३७ वाजता धावपट्टी २५ वर सर्व २२४ प्रवाशांसह सुरक्षित लँडिंग केलं. रात्री ११.४७ वाजता ही आणीबाणी मागे घेण्यात आली. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर विमानतळावरील सर्व विमानांची वाहतूक सुरळीत सुरू होती.