दिल्लीवरून चेन्नईकडे जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये प्रवासादरम्यान एक मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. विमानातील एका प्रवाशाच्या पावर बँकला अचानक आग लागल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून हे विमान तातडीने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले आणि त्याचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, इंडिगोचे ‘6E 6115’ हे विमान रविवारी (११ ऑक्टोबर २०२६) दिल्लीहून चेन्नईसाठी रवाना झाले होते. उड्डाणादरम्यान अचानक एका प्रवाशाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून (पावर बँक) धूर निघत असल्याचे केबिन क्रूच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत विमानातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निरोधक उपकरणांचा वापर करून आग पूर्णपणे विझवली.

प्रवासी अन् कर्मचारी सुरक्षित

विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वैमानिकाने तत्काळ हैदराबाद विमानतळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला आणि विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी आणि विमान कर्मचारी (केबिन क्रू) पूर्णपणे सुरक्षित आहेत.

या घटनेबाबत माहिती देताना इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले, “प्रवाशाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून धूर येत असल्याचे आढळल्यानंतर सुरक्षा नियमावलीचे तंतोतंत पालन करण्यात आले. वैमानिकाने योग्य वेळी निर्णय घेत विमान हैदराबादला सुरक्षितपणे उतरवले.”

प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची सोय

हैदराबादमध्ये लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांचा पुढील प्रवास सुरळीत व्हावा यासाठी इंडिगो प्रशासनाकडून दुसऱ्या विमानाची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, हवेत असताना पावर बँकने पेट कसा घेतला, या घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.