हैदराबादहून चंदीगडला इंडिगोचे विमान मंगळवारी उतरल्यानंतर स्थिर असताना अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. एका प्रवाशाच्या पॉवर बँकने पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली. विमानातील धुरामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, ज्यानंतर तातडीने आपत्कालीन बाहेर काढण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. या घटनेत पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

हिंदुस्तान टाईम्स् ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडिगोचे विमान (फ्लाईट ६ई १०८) हैदराबादवरून चंदीगड विमानतळावर सुखरूप उतरले होते. विमान धावपट्टीवरून टॅक्सी वे कडे जात असतानाच एका प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट झाला आणि त्यातून धूर निघू लागला. पाहता पाहता विमानाचा केबिन भाग धुराने भरून गेला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिक आणि क्रू मेंबर्सनी तात्काळ आपत्कालीन गेट्स उघडले आणि प्रवाशांना धावपट्टीवर उतरवण्यात आले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये प्रवासी विमानातून खाली उड्या मारताना आणि धावपट्टीवर धावताना दिसत आहेत. इंडिगोने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने हालचाली करण्यात आल्या. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे टर्मिनलवर नेण्यात आले आहे.”

नव्या नियमांकडे दुर्लक्ष पडले महागात?

या घटनेमुळे विमानात पॉवर बँक वापरण्याच्या धोक्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) २०२६ मध्येच पॉवर बँकबाबत कडक नियम लागू केले आहेत.

DGCA चे नवीन नियम काय सांगतात?

विमानात प्रवासादरम्यान फोन किंवा इतर उपकरणे चार्ज करण्यासाठी पॉवर बँक वापरण्यास सक्त मनाई आहे. पॉवर बँक किंवा सुट्या बॅटरी ओव्हरहेड केबिनमध्ये (डोक्यावरील कप्प्यात) ठेवता येत नाहीत. कारण तिथे आग लागल्यास ती लवकर लक्षात येत नाही. पॉवर बँक केवळ हँड बॅगेत, सीटच्या खाली किंवा प्रवाशाच्या जवळ असणे अनिवार्य आहे जेणेकरून काही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पाऊल उचलणे सोपे जाते.

तपास सुरू

विमानतळ अधिकारी आणि इंडिगोचे तांत्रिक पथक आता या विमानाची कसून तपासणी करत आहेत. जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. विमान प्रवासात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हाताळणी करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या हे विमान तांत्रिक तपासासाठी थांबवण्यात आले असून, पूर्ण तपासणीनंतरच ते पुन्हा सेवेत दाखल होईल.