एअर इंडियानंतर आता इंडिगोने त्यांच्या विमानांच्या तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मार्च २०२६ अर्थात शनिवारपासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. मध्य आशियात जो संघर्ष सुरु आहे त्यामुळे जेट फ्युएल अर्थात विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे.
इराण संघर्षामुळे जेट फ्युएलच्या दरांमध्ये वाढ
जेट फ्युएलच्या दरात ८५ टक्के जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही आता तिकिटांवरचा सरचार्ज वाढवत आहोत. ज्यामुळे तिकिट दरांमध्ये वाढ होणार आहे. इंडिगो ही भारतातली सर्वात मोठी विमान सेवा आहे. या कंपनीने आता तिकिटांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मार्चपासून म्हणजेच उद्यापासूनच ही दरवाढ लागू होणार आहे. एनडीटीव्हीने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. स्पाइसजेट, अकासा यांच्याकडूनही तिकिटांचे दर वाढवले जातील अशी चिन्हं आहेत. मध्य पूर्व देशांमध्ये अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यात तणाव वाढला आहे. ज्याचा परिणाम वैश्विक तेल बाजारावर पडला आहे. त्यामुळे कच्चं तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.
इंडिगोने कशी दरवाढ केली आहे?
इंडिगोने डोमेस्टिक म्हणजे देशांतर्गत विमान प्रवासासाठी ४२५ रुपये तिकिटामागे वाढवले आहेत. मिडल इस्ट अर्थात मध्य आशियात जाणाऱ्या विमानाच्या तिकिट दरांमध्ये ९०० रुपये वाढ केली आहे. युरोपच्या तिकिटांमध्ये २३०० रुपये वाढ केली आहे तर चीनला जाणाऱ्या विमानांच्या तिकिट दरांमध्ये १८०० रुपये वाढ करण्यात आली आहे.
इंडिगोच्या विमानांमध्ये कशी दरवाढ?
कुठे कशी दरवाढ? प्रत्येक तिकिटामागे किती रुपये वाढ?
डोमेस्टिक इंडिया – ४२५ रुपये
इंडियन सबकाँटिनेंट ४२५ रुपये
मिडल इस्ट ९०० रुपये
साऊथ इस्ट आशिया आणि चीन- १८०० रुपये
अफ्रिका-वेस्ट आशिया १८०० रुपये
युरोप २३०० रुपये
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस तिकिटांचे दरही वाढले
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांनीही अशाच पद्धतीने फ्युएल सरचार्ज वाढवला आहे, ज्यामुळे या कंपनीच्या तिकिटांचे दर वाढले आहेत. मार्च २०२६ मध्ये अॅव्हिएअशन टर्बाइन फ्युएल दर वाढले आहेत. तसंच इराण संघर्षानंतरही तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ज्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या समोर आणखी एक मोठं आव्हान आहे ते म्हणजे भारतीय रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरते आहे. उद्योग जगतातील सूत्रांची माहिती आहे की कच्चं तेल महागल्याने आणि रुपया घसरल्याने विमान कंपन्यांना दुहेरी फटका बसला आहे.
