पीटीआय, नवी दिल्ली

भारत आणि बांगलादेश यांनी शनिवारी विविध नवीन क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी आणि सागरी क्षेत्राशी संबंधित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये या करारांना अंतिम स्वरूप देण्यात आले.

बांगलादेशच्या पंतप्रधान शुक्रवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. गेल्या १५ दिवसांत हा त्यांचा दुसरा भारत दौरा ठरला आहे. दोन्ही देशांमधील प्रमुख करारांमध्ये डिजिटल क्षेत्रात मजबूत संबंध प्रस्थापित करणे, हरित भागीदारी, रेल्वे वाहतूक आदींचाही समावेश आहे. आज आम्ही नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भविष्यवादी दृष्टिकोन तयार केला आहे. हरित, डिजिटल, समुद्री क्षेत्राशी संबंधित आणि अवकाश यांसारख्या क्षेत्रातील करारांचा फायदा दोन्ही देशांच्या तरुणांना होईल’, असे मोदींनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>>“कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांनी कन्नड शिकावी, दुसऱ्या भाषा..”, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी काय आवाहन केलं?

तर भारत हा बांगलादेशचा प्रमुख शेजारी, प्रादेशिक भागीदार आणि विश्वासू मित्र असल्याचे हसीना यांनी म्हटले. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारत सरकार आणि येथील नागरिकांचे योगदान मला कृतज्ञतेने आठवते. आम्ही आज महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या ज्यात सुरक्षा, व्यापार, जोडण्या, नद्यांचे पाणी वाटप, ऊर्जा, प्रादेशिक आणि बहुपक्षीय सहकार्य आदी क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा केल्याचे हसीना यांनी सांगितले.

सर्वसमावेशक व्यापार करारावर चर्चेस सहमती

भारत-बांगलादेशने शनिवारी ‘सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारा’वर (सीईपीए) वाटाघाटी करण्यास सहमती दर्शविली. तसेच एकमेकांमधील संबंधांना चालना देण्यासाठी भविष्यवादी दृष्टिकोन तयार केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शेख हसीना यांच्याशी चर्चा केल्यानंतर सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले की, बांगलादेश हा भारताचा सर्वांत मोठा विकास भागीदार आह. सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण यासह संरक्षण सहकार्य वाढविण्यावर व्यापक चर्चा झाल्याचेही मोदींनी सांगितले.