भारत-चीन सहकार्याचे नवे पर्व सुरू!

क्षी जिनपिंग यांच्याशी चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

(संग्रहित छायाचित्र)

चेन्नईतील  चर्चेने भारत व चीन यांच्यात सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी मोदी यांची येथे साडेपाच तास अनौपचारिक चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

जिनपिंग यांच्याशी दोन दिवसांत ममलापूरम (महाबलीपुरम)  या सागर किनाऱ्यावरील निसर्गरम्य ठिकाणी मोदी यांची चर्चा झाली.

जिनपिंग यांनी सांगितले की, एकमेकांची मने जाणून घेत प्रामाणिकपणे चर्चा झाली. ही द्विपक्षीय चर्चा अधिक सखोल व चांगली झाली. भारत व चीन यांच्यातील संबंध विस्तारणे हेच आमच्या सरकारचे ठोस धोरण आहे.

शिष्टमंडळ पातळीवर बोलणीपूर्वी दोन्ही नेत्यांनी जी प्रस्तावना केली त्यातून दोन्ही देशांच्या संबंधांना नवे परिमाण लाभण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर चीन व भारत यांच्यात काही प्रमाणात कटुता असली तरी त्यावर मात करण्याचे संकेत देण्यात आले.

मोदी यांनी सांगितले की, गेल्या वर्षी चीनमध्ये वुहान येथे अनौपचारिक चर्चा होऊन दोन्ही देशातील संबंधात विश्वासाचे वातावरण तयार करण्यात आले होते. त्यात दोन्ही देशांनी सहकार्य करण्याचेही मान्य केले होते. आता चेन्नई येथील अनौपचारिक चर्चेने दोन्ही देशांतील एका नवीन सहकार्य पर्वाची सुरुवात झाली आहे. वुहान बैठकीनंतर दोन्ही देशांतील संबंधांना नवा आयाम मिळाला. दोन्ही देशात मतभेद असले तरी त्याचे रुपांतर भांडणे किंवा वादात होऊ दिले जाणार नाही, मतभेदाचे मुद्दे शहाणपणाने हाताळून एकमेकांच्या चिंतांबाबत संवेदनशीलता दाखवली जाईल. आमच्यातील संबंधामुळे जग शांतता व स्थिरतेकडे वाटचाल करील. तीच आमची मोठी कामगिरी असून त्यातूनच भविष्यकाळात प्रेरणा मिळत राहील.  दोन हजार वर्षांपूर्वी भारत व चीन हे दोन जागतिक आर्थिक महासत्ता असलेले देश होते, आता पुन्हा त्या दिशेने वाटचाल जात आहे.

क्षी जिनपिंग यांनी सांगितले की, वुहान येथील बैठकीनंतर त्याचे दृश्य परिणाम दिसून आले आहेत. आमचे धोरणात्मक सहकार्य वाढले असून लोक पातळीवरील तसेच सांस्कृतिक पातळीवरील आदान प्रदान वाढले आहे. बहुपक्षीय घटनांतही आमचे सहकार्य वाढले आहे, त्यामुळे अनौपचारिक चर्चेचा निर्णय योग्यच होता हे स्पष्ट झाले आहे. काल व आज सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाली. अतिशय प्रामाणिक व सखोल अशी चर्चा झाली.

मोदी यांनी म्हटले आहे की, फलदायी असा विचारविनिमय झाला असून त्यातून दोन्ही देशांतील संबंध आणखी वृद्धिंगत होतील.

शिष्टमंडळ पातळीवरील चर्चेपूर्वी दोन्ही नेत्यांनी फिशरमनस कोव्ह रिसॉर्टवर एकास एक चर्चा केली, ती तासभर चालली. दोन्ही देशातील द्विपक्षीय सहकार्यास त्यामुळे नवे रूप मिळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. मोदी व जिनपिंग यांनी बंदरावर फेरफटका मारला त्यावेळीही त्यांच्यात चर्चा झाली. मोदी व क्षी जिनपिंग हे नंतर गोल्फ कार्टने परत आले.

ममलापूरम बंदरावर मोदींकडून साफसफाई

स्वच्छ भारत अभियान व नंतर एकदा वापराच्या प्लास्टिकविरोधात मोहिमेची घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी स्वत:च येथील बंदरावर प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून (प्लॉगिंग) साफसफाई केली. ममलापूरम येथे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासमवेत अनौपचारिक चर्चेसाठी आले असता त्यांनी शनिवारी सकाळी फेरफटका मारताना बंदराची साफसफाई केली. त्यांनी याची तीन मिनिटांची चित्रफीत जारी करून संदेश ट्वीट केला. चित्रफितीत मोदी बंदरावरचा कचरा उचलून एकत्र करताना दिसत आहेत. चित्रफितीसमवेत मोदी यांनी लिहिले आहे की, आज सकाळी ममलापुरमच्या (महाबलीपूरम)  बंदरावर साफसफाई केली. किमान अर्धा तास हे काम केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indo china cooperation begins abn

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या