अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत सप्टेंबरमध्ये होणाऱ्या शिखर बैठकीची उत्सुकतेने वाट पाहात असून त्या शिखर बैठकीसाठी द्विपक्षीय संबंधांवर आधारित नवीन विषयसूची तयार करण्यात येईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी व व्यापार मंत्री पेनी प्रिटझकेर यांनी म्हटले आहे.
मोदी यांच्यासमवेतच्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले. या दोघांनी सांगितले की, दोन्ही देशांनी या शिखर बैठकीतील ठोस फलनिष्पत्तीसाठी विषयसूची ठरवली पाहिजे. त्यात नवीन दृष्टी, धोरण व कृती योजना यांचा समावेश असला पाहिजे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सप्टेंबरच्या अखेरीस शिखर बैठकीसाठी वॉशिंग्टनला जाणार असून तेथे त्यांची अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी चर्चा होणार आहे.
केरी व प्रिटझेकर यांनी तासाभराच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-अमेरिका यांच्यात धोरणात्मक पातळीवर काय चर्चा झाली याची कल्पना दिली. भारताशी संबंधांना ओबामा खूप महत्त्व देतात व दोन्ही देशातील सहकार्य व जागतिक भागीदारी महत्त्वाची आहे, असे सांगून ते म्हणाले की, सप्टेंबरमधील शिखर बैठक फलदायी व्हावी व त्या बैठकीची विषयसूची ठरवावी, असे अमेरिकेने स्पष्ट केल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
ओबामा यांच्या सविस्तर व वैचारिक पातळीवरील पत्राबाबत आभार मानून मोदी यांनी दोन्ही देशांच्या शिखर बैठकीतील फलनिष्पत्ती व संबंध नव्या पातळीवर जावेत, कृती योजना अमलात आणावी अशा अपेक्षा भारताने व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दोन्ही देशातील व्यापारी व गुंतवणूक संधी, स्वच्छ ऊर्जा, शैक्षणिक सहकार्य, कौशल्य विकसन, कृषी प्रक्रिया, तरूणांचे सक्षमीकरण व इतर बाबींवर मोदी यांनी भर दिला आहे.