इंडोनेशियात अकरा प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेले विमान शनिवारी (१७ डिसेंबर) बेपत्ता झाले आहे. विमानाने योग्यकर्ता शहरातील विमानतळावरून साऊथ सुलावेसी प्रांताची राजधानी मकास्सर शहराकडे उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही कालावधीत विमानाचा संपर्क तुटला. टरबोप्रोप एटीआर 42-500 असे बेपत्ता झालेल्या विमानाचे नाव आहे. जावा व सुलावेसी आयलँडच्या दरम्यान विमान बेपत्ता झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विमान बेपत्ता झाल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती इंडोनेशियातील परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.
इंडोनेशिया एअर ट्रान्सपोर्टच्या एटीआर 42-500 विमानाने योग्यकर्ता विमानतळावरून उड्डाण केले होते. साऊथ सुलावेसी प्रांताच्या राजधानीला ते विमान जात होते. त्या दरम्यान ते रडार यंत्रणेच्या बाहेर गेल्याचे इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या इंदाह पुर्णामा सारी यांनी म्हटले आहे. ‘एपी’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
विमानाशी शेवटचा संपर्क होऊ शकला त्यावेळी विमान लियांग-लियांग भागात होते. हा भाग साऊथ सुलावेसी प्रांतातील मारोस जिल्ह्यातील डोंगराळ भाग आहे. या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. वायूदलाचे हेलिकॉप्टर, ड्रोन आणि स्थानिक यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू आहे.
‘एपी’ ने दिलेल्या वृत्तानुसार, माऊंट बुलुसारौंग या पर्वतावर गिर्यारोहन करणाऱ्या काही काही गिर्यारोहकांना विमानाचे अवशेष आढळले आहेत. त्यावर इंडोनेशिया एअर ट्रान्सपोर्टचे चिन्ह असल्याचे गिर्यारोहकांनी सांगितले. तसेच आगीचे धूरही दिसले आहेत. साऊथ सुलावेसीचे मेजर जनरल बांगून नावोको म्हणाले, गिर्यारोहकांनी दिलेली माहिती स्थानिक यंत्रणांना कळवली आहे. त्या ठिकाणी रेक्यू टीम पोहोचण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, इंडोनेशिया परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या सारी यांनी विमान रडार यंत्रणेच्या बाहेर गेल्याचे सांगितले. त्यानंतर विमानाशी एटीसीचा रेडिओ संपर्क तुटल्याचे त्या म्हणाल्या.
