Indonesia Brahmos Missile Deal Final : भारताला सर्वाधिक शस्त्रांची आयात करणारा देश म्हणून आधी ओळखलं जायचं. मात्र, आता हे चित्र काहीसं बदलल्याचं दिसत आहे. भारताने विकसित शस्त्रांची निर्यात वाढवल्याचं दिसून येत आहे. कारण आता इंडोनेशिया भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. भारत आणि इंडोनेशियामध्ये २०० ते ३५० दशलक्ष डॉलर्सच्या दरम्यान ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब झालं आहे.
भारत आणि इंडोनेशियामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र करारावर शिक्कामोर्तब झालं असून इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या कराराची माहिती दिल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. दरम्यान, भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी २०२३ मध्ये इंडोनेशियाकडून चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, याआधी २०२२ मध्ये फिलिपिन्ससोबतही पहिला ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा विदेशी करार झाला होता.
याआधी फिलिपिन्सबरोबरही ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा करार
भारताने याआधी ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा फिलिपिन्सबरोबरही करार केलेला आहे. फिलिपिन्सबरोबरचा करार म्हणजे भारताची आजवरची पहिली मोठी संरक्षण निर्यात ऑर्डर होती. फिलिपिन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाने ३७४.९६ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच २,७०० कोटी रुपयांच्या या कराराला मान्यता दिली होती.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र काय आहे?
भारताने रशियाच्या सहकार्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकसित केलं आहे. ही क्रूझ क्षेपणास्त्रे सुखोई-३० एमकेआय विमानातून, जमीन आणि युद्धनौकेतूनही डागता येतात. ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या पुढील पिढीवर (ब्राह्मोस एनजी) डीआरडीओ काम करत असून ही क्षेपणास्त्रे वजनाने हलकी आणि लहान आहेत. हवाई संरक्षणाची ताकद त्यामुळे आणखी वाढते. हे क्षेपणास्त्रात ७० टक्क्यांपर्यंत देशी बनावटीचे आहे.
क्षेपणास्त्र निर्मितीत आत्मनिर्भर
भारत संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरतेला महत्त्व देत आहे. या आत्मनिर्भरतेत सर्वांत महत्त्वाचा उल्लेख करावा लागेल, तो क्षेपणास्त्रांचा. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानामध्ये आपण आत्मनिर्भरता गाठलेली आहे. आपण क्षेपणास्त्रांची निर्मितीच नव्हे, तर निर्यातही करतो. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढत आहे. संरक्षण उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्यापैकी ६० टक्क्याहून अधिक भाग देशी बनावटीचा आहे. क्षेपणास्त्रप्रणालीतील आत्मनिर्भरतेमुळे भारताच्या एकूण संरक्षणसिद्धतेला कमालीचे बळ आले आहे. या क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये अग्नी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापासून, ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे आणि इतर छोट्या क्षेपणास्त्रांचाही समावेश आहे.
क्षेपणास्त्र निर्मितीत डीआरडीओचं योगदान
क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) वाटा सर्वाधिक आहे. १९८०च्या दशकात सुरू झालेल्या या निर्मितीची साक्षीदार ही संस्था आहे. आता खासगी क्षेत्र आणि इतर सरकारी कंपन्याही विविध प्रकल्पात सहभागी झाल्या आहेत. संभाव्य धोक्यांचा विचार करून भारतामध्ये क्षेपणास्त्रे तयार केली गेली आहेत.
