Massive Landslide in Indonesia Kills 8: इंडोनेशियातील जावा या मुख्य बेटाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. शनिवारी (२४ जानेवारी) पहाटे साडे तीनच्या सुमारास झालेल्या भूस्खलनात आठ जणांचा मृत्यू झाला असून, ८२ जण बेपत्ता झाले आहेत. सध्या बेटावर बचावकार्य सुरु आहे.
मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर
असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पश्चिम जावा प्रांतातील पश्चिम बांडुंग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. सततच्या पावसामुळे काही भागात भूस्खलन झाले असून, जावा परिसरातील ३४ घरे चिखल, दगडाखाली गाडली गेली आहेत.
आठ जणांचा मृत्यू, ८२ बेपत्ता
“भूस्खलनात आठ जणांचा मृत्यू झाला असून, ८२ जण बेपत्ता आहेत. अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली गाडल्याची भीती व्यक्त केली आहे. बचाव पथकांच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत २४ जण थोडक्यात बचावले आहेत”, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ता अब्दुल मुहरी यांनी ‘एपी’ला दिली आहे.
शेतीचेही नुकसान
भूस्खलानामुळे पासिर कुनिंग हे लहान गाव सर्वाधिक प्रभावित झाले आहे. पहाटे तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे आठ जणांचा मृत्यू झाला. बचाव पथकांना आठ नागरिकांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
परिसरातील रस्ते आणि भातशेती चिखलाने माखली आहे. संपूर्ण गाव चिखल, दगड आणि उन्मळून पडलेल्या झाडांखाली झाकले गेलेत. “मुसळधार पाऊस आणि सैल झालेली जमीन यामुळे बचाव कार्यात अडचण येत आहे”, अशी माहिती पश्चिम जावाच्या आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाचे प्रमुख टेटेन अली मुंगकू एंगकुन यांनी ‘एपी’ला दिली आहे.
आणखी भूस्खलन होण्याची भीती
“भूस्खलनानंतर आपत्कालीन प्रतिसाद पथकांना त्वरित घटनास्थळी तैनात करण्यात आले. आणखी भूस्खलन होण्याची भीती असल्याने, भूस्खलन क्षेत्राच्या १०० मीटर (यार्ड) परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे”, असे टेटेन अली मुंगकू एंगकुन म्हणाले.
भूस्खलनाची शक्यता असलेल्या भागांतील रहिवाशांना सतर्क राहण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली आहे. गडगडाटाचा आवाज ऐकू आल्यास, माती सरकताना दिसली तर तात्काळ स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
डिसेंबरमध्ये भूस्खलनात १,२०० नागरिकांचा मृत्यू
दरम्यान, डिसेंबरमध्ये इंडोनेशियातील सर्वात मोठे बेट असलेल्या सुमात्रा येथे विनाशकारी पूर आणि भूस्खलनाने थैमान घातले होते. यात जवळपास १,२०० लोकांचा मृत्यू झाला आणि ७,००० हून अधिक लोक जखमी झाले होते, अशी माहिती राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने दिली आहे.
ऑक्टोबर ते एप्रिल या काळात पडणाऱ्या अवकाळी पाऊस आणि समुद्राच्या भरतीमुळे इंडोनेशियात वारंवार पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडतात. इंडोनेशिया १७,००० पेक्षा जास्त बेटांचा द्वीपसमूह आहे. लाखो लोक डोंगराळ भागात राहतात.
