लग्नाच्या वयात आलेल्या आणि लग्न न झालेल्या लोकांच्या डोक्याला ताप करणारा प्रश्न म्हणजे 'लग्न कधी करतोस?' जगभरातील सिंगल लोक या प्रश्नाने कधी ना कधी तरी छळले गेलेले असतात. नातेवाईक, मित्रमंडळी किंवा कार्यालय कुठेही गेले तरी सिंगल लोकांना त्यांच्या न झालेल्या लग्नावरून प्रश्न विचारले जातात. कधी सल्ले दिले जातात, तर काही जण लग्न करूच नकोस, यावरून त्यांचे दुःख सांगत बसतात. त्यात जर काही जणांचे लग्न जमत नसेल तर असा सिंगल व्यक्ती तर आणखी खचलेला असतो. अशाच एका खचलेल्या सिंगल व्यक्तीने लग्नाबद्दल प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची हत्या केली आहे. प्रकरण घडले आहे इंडोनेशियात. एका ४५ वर्षांच्या व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या ६० वर्षांच्या व्यक्तीची हत्या केली. सदर व्यक्ती आरोपीला नेहमी लग्नावरून टोमणे मारत होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार आरोपी परलिंडुंगन सिरेगर हा २९ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजता रागारागात शेजाऱ्यांच्या घरात शिरला आणि लाकडी दांड्याने ६० वर्षीय वृद्धाची हत्या केली. हे वाचा >> Video: शेख हसीना यांच्या घरात आंदोलकांचा धुडगूस; बेडवर झोपले, किचनमधील बिर्याणीवर मारला ताव, मासे पळवले यावेळी पीडित वृद्ध व्यक्तीने आरोपीच्या हल्ल्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपी इतका रागात होता की, त्याने लाकडी दांड्याने जबर मारहाण करत त्यांचा खून केला. मारहाणीचा आवाज ऐकून इतर शेजारीही गोळा झाले. त्यांनी वृद्ध व्यक्तीला हल्लेखोराच्या तावडीतून सोडवून लगेच रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरोपीला एका तासाच्या आत पोलिसांनी अटक केली. जेव्हा चौकशी केली तेव्हा आरोपीने या हत्येमागचा हेतू स्पष्ट केला. तू लग्न का करत नाहीस? असा प्रश्न सारखा सारखा विचारून जेरीस आणल्यामुळे मी त्यांची हत्या केली, असे आरोपीने कबूल केले आहे.