मध्य प्रदेशमधील इंदूर शहरामध्ये एक विचित्र घटना समोर आलीय. येथील एका व्यक्तीने शेजारच्या घरातील कुत्र्याला गोळी घालून ठार केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेजाऱ्यांचा पाळीव कुत्रा अरोपीच्या पत्नीला चावल्याने संतापलेल्या या व्यक्तीने कुत्र्याला थेट गोळी घालतील.

नरेंद्र विश्वय्या असं या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ५३ वर्षीय नरेंद्र यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात प्राणी संरक्षण आणि प्राण्यांना हानी पोहचवण्याच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनिष माहोर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांची हत्या करण्याच्या गुन्ह्याखाली या नरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे.

कुत्र्याने पत्नीचा चावा घेतल्यानंतर नरेंद्र यांनी कुत्र्यावर गोळी झाडली. ही गोळी कुत्र्याच्या मानेला लागली. गोळीमुळे झालेली दुखापत इतकी गंभीर होती की कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर कुत्र्याच्या मालकाने पोलिसांनी फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी नरेंद्र यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी हा कुत्रा परिसरामधील इतर व्यक्तींनाही यापूर्वी चावलेला आहे असा युक्तीवाद केला. पोलिसांनी यासंदर्भात आजूबाजूला चौकशी केली असता नरेंद्र यांनी केलेला दावा खरा ठरला. नरेंद्र यांच्या शेजाऱ्याने पाळलेला कुत्रा यापूर्वी येथील काही स्थानिकांना चावल्याच्या दाव्याला आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी दुजोरा दिला. यानंतर पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधातही तक्रार दाखल केली असून त्याच्याविरोधातही कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नरेंद्र यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या खासगी बंदुकीमधून हा गोळीबार केला असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या या बंदुकीच्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहण्याचंही काम सुरु केलं आहे.