मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये न्यायालयाने २५ वर्षीय तरुणाला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. २५ वर्षीय धनंजय यादव उर्फ डीजे याने २०२० मध्ये स्पेशल आर्म्ड फोर्सच्या कॉन्स्टेबल आणि त्यांच्या पत्नीची हत्या केली होती. धनंजय यादव याचे या दामपत्याच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. सरकारी पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कोणताही साक्षीदार नव्हता त्यामुळे घटनास्थळी सापडलेला चघळलेला च्युइंग गमचा तुकडा हा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरला. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

अल्पवयीन मुलीच्या प्रेमसंबंधातून दुहेरी हत्याकांड

अतिरिक्त सत्र न्यायाधीश हेमंत कुमार रघुवंशी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत धनंजय यादवला दोषी ठरवत स्पेशल आर्म्ड फोर्सच्या कॉन्स्टेबल ज्योती प्रसाद शर्मा (४५) आणि त्यांची पत्नी नीलम शर्मा (४३) यांच्या हत्येबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच विविध कलमांनुसार एकूण ३३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध

अभियोजन विभागाचे उपसंचालक राजेंद्र सिंह भदोरिया यांनी पीटीआयला सांगितले की, १७ डिसेंबर २०२० रोजी पहाटेच्या सुमारास एरोड्रोम पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या जोडप्याची हत्या करण्यात आली. शर्मा दाम्पत्य त्यांच्या अल्पवयीन मुलीचे धनंजय यादवसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य करण्यास विरोध करत होते. याच कारणातून मुलगी आणि धनंजय यांनी मिळून हत्येचा कट रचल्याचा आरोप अभियोजन पक्षाने केला.

च्युइंग गमवरील डीएनएमुळे झाला गुन्ह्याचा उलगडा

भदोरिया यांनी सांगितले की, या प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता त्यामुळे पोलीस वैज्ञानिक तपासावर अवलंबून राहिले. घटनास्थळावर सापडलेला चावलेला च्युइंग गम जप्त करून त्यावरील डीएनए नमुना तपासण्यात आला. हा डीएनए नमुना धनंजय यादवच्या डीएनएशी जुळल्याने तो हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. डीएनए पुराव्याबरोबरच इतर परिस्थितीजन्य पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले.

वैज्ञानिक पुराव्याच्या आधारे शिक्षा

डीएनए आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे स्पेशल आर्म्ड फोर्स कॉन्स्टेबल आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी धनंजय यादवला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.