आपल्या देशात आधार कार्ड आता सगळ्या सरकारी सेवांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र हेच आधार कार्ड एका कुटुंबाचा खूप मोठा आधार ठरले आहे. इंदौरमधल्या एका कुटुंबातला १८ वर्षांचा मुलगा दोन वर्षांपूर्वी हरवला होता. त्याला शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबाने खूप प्रयत्न केले. मात्र ते फोल ठरले. मात्र आधार कार्डमुळे हा मुलगा त्यांना दोन वर्षांनी सापडला आहे. यामुळेच या कुटुंबाचा आनंद गगनात मावत नाहीये.

इंदौरमध्ये रमेश चंद्र हे मजुरी करतात, त्यांचा १८ वर्षांचा मुलगा नरेंद्र दोन वर्षांपासून हरवला होता. नरेंद्र गतिमंद आहे. त्यामुळे तो सापडेल की नाही याची आशा जवळपास सोडली असताना, रमेश चंद्र यांना आधार कार्डमुळे आपल्या मुलाची माहिती मिळाली, ज्यानंतर नरेंद्रच्या आई वडिलांना खूप आनंद झाला. इंदौरहून १४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बंगळुरूमध्ये एका अनाथ आश्रमात नरेंद्र राहात असल्याची माहिती त्याच्या आई वडिलांना मिळाली, आता ते आपल्या मुलाला आणण्यासाठी बंगळुरूला रवाना झाले आहेत. एबीपी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, नरेंद्र आणि त्याच्या वडिलांची लवकरच भेट होणार आहे.

बंगळुरूच्या अनाथ आश्रमात चार दिवसांपूर्वी आधार कार्ड तयार करण्यासाठी कँप लावला गेला होता. या आधार कार्ड कँपमध्ये एक २० वर्षांचा गतिमंद मुलगा मशीनसमोर बसला तेव्हा त्याच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आले आणि त्याच्या डोळेही स्कॅन करण्यात आले. मात्र आधारच्या मशीनने हे दोन्ही रिजेक्ट केले, कारण त्याच्या नावे आधीच एक आधार कार्ड तयार झाल्याची माहिती आधारचा कँप घेतलेल्यांना मिळाली. या तरूणाचे नाव नरेंद्र असून तो इंदौरच्या निरंजनपूरचा आहे अशी माहितीही मिळाली. ज्यानंतर अनाथ आश्रमाने लगेचच इंदौरला संपर्क साधला,  हात्यानंतर मुलगा रमेश चंद्र यांचा हरवलेला मुलगा नरेंद्रच आहे अशी माहिती समजली.

नरेंद्रची भेट त्याच्या आई वडिलांशी घालून द्या असे आदेशच जिल्हाधिकारी निशांत वरवंडे यांनी दिले आहेत. तसेच इंदौर जिल्हा प्रशासनाने या मुलाची सगळी आर्थिक जबाबदारीही घेतली आहे अशीही माहिती वरवंडे यांनी दिली आहे. २ वर्षांनी मुलगा भेटणार म्हणून त्याच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. जो मुलगा परत यायची आशाच त्याच्या वडिलांनी सोडली होती, तो मुलगा आता दोन वर्षांनी सापडला आहे. नरेंद्रला भेटण्याचा आनंद त्याच्या वडिलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसून येत होता.