Indore School : हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी एका शाळेने दोन दिवस वेगवेगळं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. वार्षिक स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांच्या अंतर्गत कलागुणांना वाव देणारा दिवस असतो. गाणं, नाटक, वक्तृत्व स्पर्धा, कविता वाचन, अभिनय अशा अनेक गोष्टी सादर होत असतात. भरगच्च अशा कार्यक्रमांनी भरलेला हा दिवस असतो. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सभागृह फुलून गेलेलं असतं. मात्र इंदूरच्या एका शाळेने दोन दिवस स्नेहसंमेलन ठेवलं होतं. याचं कारण होतं ते म्हणजे हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थी. शाळेतल्या हिंदू विद्यार्थ्यांसाठी एक दिवस तर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी एक दिवस असं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे.

नेमकं प्रकरण काय?

इंदूर येथील खजरानामधल्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ बॉम्बे या शाळेने मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी आणि हिंदू विद्यार्थ्यांसाठी २ आणि ३ फेब्रुवारीला वेगवेगळं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. अनेक मुस्लिम पालकांनी याबाबत माहिती देताना हे सांगितलं की हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळं स्नेहसंमेलन आणि मुस्लिमांसाठी वेगळं स्नेहसंमेलन याची पूर्वकल्पना आम्हाला देण्यात आलेली नव्हती. ज्यावेळी आम्ही आमच्या मुलांसाठी त्या ठिकाणी पोहचलो तेव्हा आम्हाला कळलं की हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळं स्नेहसंमेलन आहे.

शाळेने याबाबत काय सांगितलं आहे?

शाळेचे प्रवेश अधिकारी जॉय जोसेफ यांनी ही माहिती दिली की आम्ही दोन दिवशी दोन स्नेहसंमेलनं घेतली ही वस्तुस्थिती आहे. ३ फेब्रुवारीला शब-ए-बारात असल्याने आम्हाला वाटलं की मुस्लिम विद्यार्थी स्नेहसंमेलनात सहभागी होऊ शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांचं स्नेहसंमेलन २ फेब्रवारीला घेतलं आणि हिंदू समाजाच्या विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन ३ फेब्रुवारीला घेतलं. तसंच आम्ही रविंद्र नाट्यगृह या ठिकाणी हे स्नेहसंमेलन घेतलं त्या सभागृहाची क्षमताही एकदम इतके पालक बसतील एवढी नव्हती या कारणामुळेही आम्ही दोन दिवस स्नेहसंमेलनाचं आयोजन केलं होतं. तसंच आमची वार्षिक स्नेहसंमेलनाची तारीख ठरलेली असते, त्यामुळे त्यात आम्ही बदल केला नाही. दरम्यान शाळेच्या प्राचार्य मंजू चोप्रा यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. Newslaundry ने हे वृत्त दिलं आहे.

मुस्लिम पालकांनी स्नेहसंमेलनाबाबत काय सांगितलं?

मिर गुलरेझ अली यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा स्नेहसंमेलनाला पोहचलो तेव्हा तिथे सगळे मुस्लिम विद्यार्थीच होते. कार्यक्रमाला कुणीही प्रमुख पाहुणे नव्हते. शाळेचे शिक्षक आणि कर्मचारीही अत्यल्प प्रमाणात तिथे उपस्थित होते. आता शाळा म्हणते आहे शब-ए-बारातसाठी त्यांनी हे स्नेहसंमेलन एक दिवस आधी घेतलं. जर इतकी काळजी होती तर मग शाळेने स्नेहसंमेलनाची तारीख का बदलली नाही? शाळेने हा सरळसरळ भेदभाव केला आहे. हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांचं वेगळं स्नेहसंमेलन घेऊन शाळेने काय साध्य केलं? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आमच्या मुलांचा धर्म वेगळा आहे म्हणून आमच्या मुलांसाठी वेगळं स्नेहसंमेलन भरवलं गेलं. शाळेने हे करुन नेमकं काय साध्य केलं? शाळा म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याकडे समान दृष्टीकोनातून पाहिलं गेलं पाहिजे. त्याच्या धर्मावरुन त्याला ओळख मिळता कामा नये जे घडलं ती बाब निंदनीय आणि अपमानास्पद आहे असं एका विद्यार्थिनीच्या आईने म्हटलं आहे.