इंदूर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी शुक्रवारी इंदूर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले. त्याबरोबरच अतिरिक्त आयुक्तांची शहरातून तातडीने बदली करण्यात आली आहे. इंदूरमधील भागीरथपुरा भागातील दूषित पाण्यामुळे किमान १० जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

भविष्यात यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करत असल्याचे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण होऊन आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा आकडा १५ असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी या दाव्याला दुजोरा दिला नाही. तर आपल्याला १० मृत्यूंबद्दल माहिती मिळाल्याचे शहराचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी सांगितले. दरम्यान, भागीरथपुरामधील संपूर्ण पेयजल पुरवठा पाइपलाईनची तपासणी केली जात असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय दुबे यांनी दिली.

दरम्यान, इंदूरमध्ये किमान १० बळी घेणाऱ्या आणि १,४००पेक्षा जास्त जणांचा प्रकृती बिघडण्यास कारणीभूत असणाऱ्या अतिसाराचे कारण दूषित पाणी हेच आहे, असे प्रयोगशाळेच्या चाचणीत सिद्ध झाले आहे. शहरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत ही चाचणी करण्यात आली. इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. माधव प्रसाद हसानी यांनी गुरुवारी यासंबंधी माहिती दिली, मात्र त्यांनी त्याचे अधिक तपशील सांगितले नाहीत.

जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केल्यानंतर आम्ही राज्याच्या इतर भागांसाठीही सुधारात्मक उपाययोजना करत आहोत. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निश्चित कालावधीसाठी आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. – मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्मलेल्या बाळाचा बळी

मृतांमध्ये भागीरथपुराच्या मराठी मोहल्ल्यातील आव्यान साहू या सहा महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. विवाहानंतर १० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जन्माला आलेल्या आव्यानचा २९ डिसेंबरला मृत्यू झाल्याने त्याच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आव्यानला त्याच्या पालकांनी पिशवीतील दुधात पाणी मिसळून दिले होते. या एका निरुपद्रवी कृतीमुळे त्यांना बाळाच्या जीवाची किंमत मोजावी लागली. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. मात्र, साहू कुटुंबीयांना हे पैसे घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. या पैशांनी आमचा नातू परत येणार आहे का, असा प्रश्न आव्यानची आजी कृष्णा साहू यांनी विचारला.

काँग्रेस नेत्यांची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूंवरून मध्य प्रदेशातील डबल-इंजिन सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मध्य प्रदेश राज्य गैरकारभाराचे केंद्रस्थान झाले आहे असे नमूद करत राहुल यांनी बनावट खोकल्याच्या औषधामुळे झालेले मृत्यू, सरकारी रुग्णालयांमधील गलिच्छपणा आणि आता दूषित पाण्याचे बळी अशी विविध उदाहरणे दिली.

इंदूरमध्ये पाणी नव्हे तर विषाचा पुरवठा झाला आणि प्रशासक गाढ झोपेत आहे. प्रत्येक घर शोकाने भरले आहे. गरीब हतबल आहेत आणि भाजप नेते उद्धट विधाने करत आहेत. जेव्हा कधी गरीब मरतात तेव्हा मोदी नेहमीच गप्प राहतात. – राहुल गांधी, नेते, काँग्रेस

उच्च न्यायालयाचा हस्तक्षेप भोपाळ : इंदूर शहराला स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, असे निर्देश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने इंदूर महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी अतिरिक्त टँकरने पाणीपुरवठा करावा, असे न्यायालयाने सुचवले. या प्रकरणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. न्या. द्वारकाधीश बन्सलंद आणि न्या. राजेंद्रकुमार वाणी यांच्या खंडपीठाने महापालिका आणि राज्य सरकारला नियमितपणे स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना केली.