RSS Advice to Sonam Wangchuk Over NEET protest: सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी पुकारलेले बेमुदत उपोषण, २६ व्या दिवशी सोडले. उपोषण सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वांगचुक यांना आंदोलन भारतीय पातळीवरच ठेवण्याचा सल्ला दिला. “या आंदोलनावर परकीय शक्तींनी ताबा मिळवला आहे”, असा आरोप आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे.

सीजेपी परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली एजन्सी – इंद्रेश कुमार

इंद्रेश कुमार यांनी जम्मूत माध्यमांशी संवाद साधला. सोनम वांगचुक आणि सीजेपी या दोन स्वतंत्र संस्था असल्याचे वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी केले. सीजेपी ही परकीय शक्तींचा पाठिंबा असलेली एजन्सी म्हणून काम करत असल्याचा आरोप कुमार यांनी केला. तसेच, आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांचे स्वतःचे अजेंडे असल्याचा दावाही त्यांनी केला. “परकीयांच्या हातातील बाहुले होऊ नका”, असा असे इंद्रेश कुमार वांगचुक यांना उद्देशून बोलताना म्हणाले.

विरोधकांनी आंदोलन चुकीच्या दिशेने वळवले

“देशातील राजकीय वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत”, असा आरोप इंद्रेश कुमार यांनी केला आहे. “विरोधी पक्षांकडून सुरुवातीला नीट परीक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला पण, आता राजकीय फायद्यासाठी आंदोलनाला चुकीच्या दिशेने वळवले”, असा आरोप कुमार यांनी केला. जंतर मंतरवर आंदोलनस्थळी जाणाऱ्या तरुणांना सावध राहण्याचे आवाहन कुमार यांनी केले. “देशाशी गद्दारी व फसवणूक करणाऱ्यांचे बाहुले होऊ नका”, असे कुमार म्हणाले.

पाकिस्तानवरही टीका

“देशाला विकसित, समृद्ध व सुशिक्षित राष्ट्र म्हणून उदयास येण्यापासून रोखण्यासाठी देशांतर्गत आणि बाह्य शक्ती या आंदोलनांना पाठिंबा देत आहेत”, असा आरोप कुमार यांनी केला. युवकांनी विकासित भारताच्या वाटचालीत हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. कुमार यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याबद्दल पाकिस्तानवरही टीका केली.