Rahul Gandhi Inflation Warning: इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा भासू लागला, परिणामी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवले गेले. तरीही पुरेशा प्रमाणात गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार होत आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार का? अशी भीती लोकांमध्ये आहे. यावर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत होत असलेले अवमूल्यन आणि वाढत्या इंधन दरामुळे देशात आगामी काळात महागाईची मोठी लाट येणार असल्याचा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

राहुल गांधी यांनी शनिवारी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले, “डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होऊन १०० च्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर औद्योगिक इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ होत आहे. हे केवळ आकडे नाहीत, तर आगामी काळात येऊ घातलेल्या महागाईचे स्पष्ट संकेत आहेत.”

इराण युद्धामुळे जगापुढे ऊर्जासंकटाच्या भीतीने, शुक्रवारी भारतीय रुपयाने प्रति डॉलर ९३ चा टप्पा ओलांडून, ९३.७१ असा ऐतिहासिक नीचांक नोंदवला. तब्बल ८२ पैशांचे (१ टक्का) त्याने सोसलेले नुकसान, ही गेल्या चार वर्षांत एका दिवसात झालेली सर्वात मोठी मूल्य हानी होती. रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केली आहे.

प्रत्येक कुटुंबावर परिणाम दिसणार

राहुल गांधी म्हणाले की, रुपयाची घसरण, इंधनाचे वाढलेले दर यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या साखळीवर परिणाम होणार आहे. केंद्र सरकार या चिंताजनक परिस्थितीला सामान्य असल्याचे सांगत असले तरी हे वास्तव नाही. याची झळ प्रत्येक सामान्य कुटुंबीयांच्या खिशाला बसणार आहे. याचे थेट आणि गंभीर परिणाम कोणते होणार? याचीही त्यांनी माहिती दिली.

Indian Rupee Hits Historic
युद्धामुळे रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत (फोटो – AI Generated Image)

हे चार परिणाम होणार

  • उत्पादन आणि वाहतूक महाग होणार
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सर्वाधिक फटका बसणार
  • दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढणार
  • परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) पैसा वेगाने देशाबाहेर जाईल. ज्यामुळे शेअर बाजारावर दबाव वाढेल

निवडणुकीनंतर महागाईची लाट

पुढील काही दिवसांत पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यांमध्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका होत आहेत. या निवडणुकीनंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरात वाढ होणार, असाही दावा राहुल गांधी यांनी या पोस्टद्वारे केला आहे.