देशात सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे विरोधक केंद्र सरकार टीका करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी महागाईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी वाढत्या महागाईची तुलना पंतप्रधान मोदींच्या दाढीशी केली. राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कमलनाथ बुरहानपुरला पोहोचले होते, यावेळी ते बोलत होते. 

कमलनाथ म्हणाले, “जे दिल्लीत दाढी वाढवून बसले आहेत, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की त्यांची दाढी एक इंच वाढते. महागाई एवढी वाढली आहे की, त्याचा परिणाम आता जनतेच्या ताटात दिसून येत आहे. लोकांच्या ताटातील पदार्थ कमी कमी होत आहेत.”

कमलनाथ यांनी राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर देखील निशाणा साधला. कमलनाथ म्हणाले की, “शिवराजजींबद्दल मी सुरुवातीपासूनच म्हणत आलो आहे की, ते चांगले अभिनेते आहेत, चांगले कलाकार आहेत. त्यांना कलेची चांगली जाण आहे. ते सकाळपासून रात्रीपर्यंत खोटे बोलतात आणि जनतेची दिशाभूल करतात.”

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी मोडला विक्रम!

पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवसांच्या विरामानंतर बुधवारी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर देशभरात विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३१ ते ३५ पैशांनी तर डिझेलच्या दरात ३३ ते ३७ पैशांनी वाढ झाली आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे भारतातील पंपांच्या किमती प्रति बॅरल $८४ च्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ४ मे २०२० पासून सातत्याने वाढत असणाऱ्या ऑटो इंधनाच्या किमतींमुळे पेट्रोल प्रति लिटर अंदाजे ३६.३५ रुपये आणि डिझेल सुमारे २९ रुपयांनी महागले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी वाढ झाल्याने सरकारवर कर कमी करण्याचा दबाव येऊ शकतो, ज्यामुळे महसूल आणि खर्चावर विपरित परिणाम होऊ शकतो.