ऑगस्ट महिन्यात देशातील किरकोळ महागाई दरात वाढ होऊन तो ७ टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे आता पुन्हा व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचबरोबर, देशाच्या किरकोळ चलनवाढीतील (CPI Inflation) मागील तीन महिन्यांपासूनची घसरणीची मालिका देखील ऑगस्ट महिन्यामध्ये खंडीत झाली. ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाई दरात झालेल्या वाढासाठी प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये झालेली वाढ जबाबदार मानली जात आहे. आज(सोमवार) जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही बाब समोर आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई जुलैमधील ६.७१ टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये ७ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हा दर ५.३० टक्के होता. किरकोळ महागाई दरातील वाढ हे स्पष्टपणे सूचित करते की देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे. देशात खाद्यपदार्थांच्या तसेच घरगुती वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

याशिवाय, जुलैमध्ये देशातील औद्योगिक उत्पादन (IIP) २.४ टक्के वाढले आहे. वर्षभरापूर्वी जुलै २०२१ मध्ये देशातील औद्योगिक उत्पादनात ११.८ टक्क्यांनी वाढ झाली होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) आज जाहीर केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या (आयआयपी) आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्टापेक्षा १ टक्का जास्त –

ग्राहक किंमत निर्देशांकाची (CPI) सध्याची पातळी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) निर्धारित केलेल्या सहा टक्के मर्यादेपेक्षा पूर्ण एक टक्का वर आहे. खरं तर, किरकोळ महागाईची पातळी सलग आठ महिन्यांपासून आरबीआयच्या उद्दिष्टापेक्षा जास्तच आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेलाही वारंवार व्याजदरात वाढ करावी लागली आहे. परंतु, आतापर्यंत याला निश्चित केलेल्या मर्यादेत आणता आलेले नाही. महागाई दराचे हे आकडे तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षाही जास्त आहेत. रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणात तज्ज्ञांनी ऑगस्टमध्ये महागाईचा दर ६.९ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

अन्नधान्य महागाई ७.६२ टक्क्यांवर –

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्य महागाईचा दर ऑगस्ट महिन्यात ७.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर जुलै महिन्यात ६.६९ टक्के आणि गेल्या वर्षी याच महिन्यात ३.११ टक्के होता. महागाई दराचे हे आकडे तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा काही जास्त आहेत.