पीटीआय, नवी दिल्ली : किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराने सरलेल्या एप्रिलमध्ये ७.७९ टक्के हा आठ वर्षांतील उच्चांकी स्तर नोंदविला. मुख्यत: अन्नधान्याच्या किमतींतील भडक्यामुळे महागाई दराने ही चिंताजनक पातळी गाठली. महागाई दर सलग चौथ्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील पातळीच्या तुलनेत अधिक राहिला आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरलेल्या मार्चमध्ये १७ महिन्यांचे उच्चांकपद गाठत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ६.९५ टक्क्यांवर गेला होता. हा दर चालू वर्षांत जानेवारीपासूनच ६ टक्क्यांच्या वर राहिला आहे. महागाई दर ४ टक्क्यांवर (वर-खाली २ टक्क्यांच्या फरकाने) राहील, हे पाहण्याची वैधानिक जबाबदारी रिझव्‍‌र्ह बँकेवर आहे. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल २०२१ मध्येही हा दर ४.२३ टक्के पातळीवर होता. अन्नधान्य घटकांमधील महागाई दर एप्रिलमध्ये ८.३८ टक्क्यांवर पोहोचला आह़े  तो गेल्या महिन्यात ७.६८ टक्के होता. एप्रिलमधील महागाई दराच्या आकडेवारीतील तीव्र उसळीमागे हेच महत्त्वाचे कारण ठरले आहे. वर्षभरापूर्वी याच महिन्यात अन्नधान्यातील महागाई दर १.९६ टक्के पातळीवर होता.

महागाईसंबंधी अंदाजात वाढ शक्य

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या आठवडय़ात रेपो दर आणि रोख राखीव प्रमाणात वाढ करताना, वर्तमान स्थितीवर भाष्य केले. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात भडकलेल्या महागाईवर अंकुश लावण्यास प्राधान्यक्रम म्हणून व्याजदर वाढीचे पाऊल टाकावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एप्रिलमध्ये आणि पुढील काळात वाढत्या महागाईचा ताण कायम राहण्याचाही त्यांनी कयास व्यक्त केला होता. त्या्मुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या पतधोरण निर्धारण समितीच्या बैठकीत, महागाईसंबंधी आगामी अंदाजात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एप्रिलमधील बैठकीत महागाईसंबंधी पूर्वानुमानात वाढीसह, मध्यवर्ती बँकेने २०२२-२३ मधील अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या कयासाला कात्री लावली आहे.

भाववाढ अशी..

अन्नधान्य घटकांमध्ये खाद्यतेल आणि तूप, लोणी आदी स्निग्ध पदार्थात तीव्र भाववाढ नोंदविण्यात आली आह़े  एप्रिलमध्ये त्यात वार्षिक तुलनेत १७.२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शिवाय फळे, भाजीपाल्याच्या किमती १५.४१ टक्क्यांनी कडाडल्या, मसाले १०.५६ टक्क्यांनी आणि मांस व मासे ६.९७ टक्क्यांनी वधारले आहेत.

तयार खाद्यान्ने, अल्पोपहार, मिठाई इत्यादींमध्ये गेल्या महिन्यात ७.१० टक्क्यांनी वाढ झाली.  तृणधान्ये ५.९६ टक्क्यांनी आणि दूध आणि दुग्धजन्य उत्पादने ५.४७ टक्क्यांनी महागली आहेत.

एप्रिलमध्ये इंधन आणि वीज १०.८० टक्क्यांनी महाग, कपडे आणि पादत्राणांच्या किमतीत ९.८५ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली.

औद्योगिक उत्पादन दरात १.९ टक्क्यांनी वाढ

देशातील औद्योगिक उत्पादनाने सरलेल्या मार्च २०२२ मध्ये १.९ टक्क्यांची वाढ दर्शविली. सुटय़ा घटकांच्या किमती गगनाला भिडूनही नोंदवण्यात आलेली ही वाढ दिलासादायक मानली जाते. अधिकृत आकडेवारीनुसार, निर्मिती क्षेत्रातून मार्चमध्ये अवघी ०.९ टक्क्यांची वाढ दिसून आली असली तरी खाण उत्पादन ४ टक्क्यांनी आणि वीज निर्मिती क्षेत्रात ६.१ टक्क्यांची वाढ दिसून आली. मार्चच्या आकडेवारीला जमेस धरून, २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी औद्योगिक उत्पादन दर ११.३ टक्के नोंदविण्यात आला आहे.