‘९/११’ तपासाची कागदपत्रे खुली

स्मृतीस्थळी श्रद्धांजली…अमेरिकेतील ९/११ हल्ल्यात  २९८३ लोक मरण पावले होते

हल्लेखोरांना रसद पुरवठा करणाऱ्यांची माहिती

अमेरिकेत ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची काही वर्गीकृत म्हणजे गोपनीय कागदपत्रे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या संस्थेने खुली केली आहेत. एकूण १६ पाने खुली करण्यात आली असून त्यात सौदी अरेबियाच्या अपहरणकर्त्यांना रसद पुरवठा कुणी व कसा केला याची माहिती आहे.

या कागदपत्रात अपहरणकर्त्यांचे कुणाशी संपर्क होते, सौदी अरेबियाच्या अमेरिकेतील कोणत्या लोकांशी त्यांचा संबंध होता याचीही माहिती आहे. पण हा कट सौदी अरेबियाने घडवल्याचे कुठलेही पुरावे त्यातून मिळालेले नाहीत.

हल्ल्याच्या विसाव्या स्मृती दिनानिमित्ताने ही कागदपत्रे खुली करण्यात आली असून जो बायडेन यांनी सत्तेवर आल्यानंतर प्रथमच ही कागदपत्रे खुली केली आहेत. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांनी बायडेन यांच्याकडे आग्रह धरला होता, की या हल्ल्याची कागदपत्रे सरकारने आता खुली करावीत. वरिष्ठ सौदी अधिकाऱ्यांचा या हल्ल्यात सहभाग असावा या संशयावरून त्यांनी न्यूयॉर्कमध्ये खटले दाखल केले असून त्यात या कागदपत्रांचा उपयोग होईल असे त्यांना वाटत आहे. सौदी सरकारने या हल्ल्यात हात असल्याचा नेहमीच इन्कार केला आहे. अमेरिकेतील सौदी दूतावासाने बुधवारी म्हटले आहे, की कागदपत्रे खुली करण्यास  आमचा पाठिंबा आहे त्यामुळे सौदी अरेबियाने हा हल्ला केल्याचा गैरसमज दूर होण्यास मदत होईल. दूतावासाने म्हटले आहे, की या हल्ल्यात सौदी अरेबियाचा कुठलाही सहभाग नव्हता. त्यामुळे हे आरोप खोटे आहेत.

स्मृतीस्थळी श्रद्धांजली…अमेरिकेतील ९/११ हल्ल्यात  २९८३ लोक मरण पावले होते. हल्ल्याच्या विसाव्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी फुले व राष्ट्रीय ध्वज ठेवण्यात आला होता. काही लोकांच्या नावाशेजारी भारतीय ध्वजही ठेवण्यात आला. त्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष जो बायडेन, प्रथम महिला जिल बायडेन, माजी अध्यक्ष बराक ओबामा, मिशेल ओबामा, माजी अध्यक्ष  बिल क्लिंटन, माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन हे उपस्थित होते. या वेळी मृतांच्या नातेवाइकांनी हल्ल्यात मारल्या गेलेल्या त्यांच्या आप्तांची नावे वाचून दाखवली.

‘दहशतवादाच्या धोक्याची कटू आठवण’

न्यूयॉर्क : ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेला हल्ला हा सदैव दहशतवादाच्या धोक्याची कटू आठवण करून देत राहील, असे मत भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजित सिंग संधू यांनी व्यक्त केले. त्यांनी या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ‘न्यूयॉर्क’  या हॅशटॅगने म्हटले आहे, की त्या क्रूर हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी गेले.  या घटनेला आता वीस वर्षे उलटून गेली आहेत. या घटनेतून दहशतवादाच्या कटू स्मृतींची आठवण सदैव राहणार आहे. त्यांच्या समवेत भारताचे महावाणिज्यदूत रणधीर जैसवाल व  इतर भारतीय अधिकारी होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Information about the logistics suppliers to the attackers akp

ताज्या बातम्या