प्रतिदिन ४५ लाख नमुना चाचण्यांचे लक्ष्य

देशात प्रतिदिन १२-१३ लाख आरटी-पीसीआर तसेच, १७ लाख अतिजलद प्रतिद्रव चाचण्या करण्याची क्षमता आहे.

‘आयसीएमआर’चे महासंचालक बलराम भार्गव यांची माहिती

नवी दिल्ली : देशभरात प्रतिदिन २० लाख नमुना चाचण्या केल्या जात असून महिनाअखेर हे प्रमाण २५ लाखांवर व जूनमध्ये दैनंदिन ४५ लाख नमुना चाचण्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असेल, अशी माहिती गुरुवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी दिली.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरांसह निमशहरे आणि ग्रामीण भागांमध्येही रुग्णवाढ होत असून करोनाबाधित रुग्णांचे तातडीने विलगीकरण करण्यासाठी अतिजलद प्रतिद्रव चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. अजूनही दैनंदिन रुग्णवाढ २ लाखांपेक्षा जास्त होत असून काही जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांपेक्षाही अधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध कायम ठेवावे लागतील. त्यामुळे अधिकाधिक अतिजलद प्रतिद्रव चाचण्या करण्याची सूचना सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना दिली असल्याचेही भार्गव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

देशात प्रतिदिन १२-१३ लाख आरटी-पीसीआर तसेच, १७ लाख अतिजलद प्रतिद्रव चाचण्या करण्याची क्षमता आहे. मार्चमध्ये ८ लाख नमुना चाचण्या झाल्या, हे प्रमाण आता वाढून २० लाखांपर्यंत गेले आहे. या काळात सरासरी संसर्गदर २३ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आला. या चाचण्यांमध्ये आरएटीचे प्रमाण अधिक आहे. आरएटीमुळे करोनाबाधित रुग्णावर लगेच उपचार सुरू करता येऊ शकतात व रुग्णसंख्या कमी करता येऊ शकते, असे भार्गव म्हणाले.

रुग्णवाढ २१० जिल्ह्यांमध्ये सीमित

रुग्णांमध्ये वाढ होत असलेल्या जिल्ह्यांची संख्या २९ एप्रिल-५ मे या काळात ३०३ होती, ती १३-१९ मे या काळात २१० जिल्ह्यांवर आलेली आहे.

गेले १० आठवडे संसर्गदरात सातत्याने वाढ होत होती, मात्र गेल्या २ आठवड्यांमध्ये मात्र संसर्गदर कमी होत असल्याचे दिसते. गेल्या चोवीस तासांत सरासरी संसर्गदर १३.३ टक्क्यांवर आला. २९ एप्रिल-५ मे या काळात संसर्गदर २१.५ टक्के होता, १३-१९ मे याकाळात हा दर १५.२ टक्क्यांवर आला.

७ राज्यांमध्ये संसर्गदर २५ टक्क्यांपेक्षा जास्त असून २२ राज्यांत संसर्गदर १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

नमुना चाचणीतही गेल्या १२ आठवड्यांमध्ये २.३ पटीने वाढ झाली. गेल्या दोन दिवसांमध्ये प्रतिदिन २० लाखांपेक्षा जास्त नमुना चाचण्या केल्या गेल्या.

१ लाखांपेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या राज्यांची संख्या आता ११ वरून ८ वर आली आहे. ९ राज्यांमध्ये ५० हजार, १९ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी उपचाराधीन रुग्ण आहेत.

कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये रुग्णवाढ वेगाने होत होती मात्र, आता या राज्यांमध्येही दैनंदिन रुग्णवाढ कमी होऊ लागली आहे. दिल्लीतही दैनंदिन रुग्णवाढ ४ हजारांपेक्षा कमी होत आहे.

तरीही हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या १० राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णवाढ सर्वाधिक आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये ५० टक्के मृत्यू महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या ५ राज्यांमध्ये झाले.

घरगुती चाचणी: पुण्याच्या ‘मायलॅब’ने विकसित केलेल्या संचाला मान्यता

घरगुती नमुना चाचणी संच पुढील ३-४ दिवसांमध्ये उपलब्ध होऊ शकेल. पुण्यातील मायलॅब या कंपनीच्या कोव्हसेल्फ या चाचणीसंचाला परवानगी देण्यात आली आहे. अन्य ३ कंपन्यांनीही अशाच स्वरूपाच्या घरगुती चाचण्यांच्या संचांसाठी अर्ज केले असून त्यांनाही पुढील आठवड्यांत परवानगी दिली जाईल, अशी माहितीही भार्गव यांनी दिली. घरगुती नमुना चाचणी करण्याचे चार टप्पे आहेत. नमुना चाचणी संच खरेदी करा, मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करा, नमुना चाचणी करा आणि मोबाइलवर फोटो काढून ही प्रतिमा अपलोड करा. चाचणीचा निष्कर्ष पाहता येईल, असेही भार्गव यांनी सांगितले. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवायही औषध दुकानातून तसेच ऑनलाइन पद्धतीने चाचणी संच खरेदी करणे शक्य आहे.

५० टक्के मुखपट्टीविना

देशातील ५० टक्के लोक मुखपट्टी वापरत नसल्याचे आढळले आहे. मुखपट्टी वापरणाऱ्या लोकांपैकी ६४ टक्के लोक मुखपट्टी नाकावर न ठेवता फक्त तोंडावर ठेवतात, २० टक्के लोक मुखपट्टी हनवटीवर ठेवतात. २ टक्के लोक मुखपट्टी गळ्यात अडकवतात. फक्त १४ टक्के लोक योग्यपद्धतीने मुखपट्टीचा वापर करतात असे निरीक्षण अगरवाल यांनी नोंदवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Information from balram bhargava director general icmr akp

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या