Sadhvi Prem Baisa Death : राजस्थानमधील प्रसिद्ध साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. साध्वी प्रेम बैसा या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांनी व्हायरल व्हिडीओबाबत स्पष्टीकरण देत तो व्हिडीओ खोटा असल्याचं सांगितलं होतं.
संबंधित व्हायरल व्हिडीओबाबत पोलीस कारवाई करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आरोपीच्या कुटुंबाने साध्वीची माफी मागितल्याने आपण आरोपीला माफ केल्याचं साध्वी यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, साध्वी प्रेम बैसा यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
वृत्तानुसार, साध्वी प्रेम बैसा या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यामुळे त्यांना आश्रमात बोलावलेल्या एका व्यक्तीने इंजेक्शन दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. साध्वी प्रेम बैसा यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला.
दरम्यान, साध्वी प्रेम बैसा यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी खासदार हनुमान बेनीवाल यांनी केली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीसांनी संबंधित आश्रमात जाऊन साध्वी प्रेम बैसा यांची खोली सील केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ
वृत्तानुसार, साध्वी प्रेम बैसा यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सुमारे चार तासांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या पोस्टमध्ये अग्निपरीक्षा, अलविदा आणि न्याय अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पोस्टबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

