तिहार कारागृहात कैद्याचा गूढ मृत्यू

अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या तिहार कारागृहातील आठ क्रमांकाच्या कक्षात पृथ्वी हा ३२ वर्षीय कैदी गूढरीत्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे.

अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या तिहार कारागृहातील आठ क्रमांकाच्या कक्षात पृथ्वी हा ३२ वर्षीय कैदी गूढरीत्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे.
पृथ्वी याचा खून करण्यात आला का हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तिहार कारागृहातील सुरक्षारक्षकांना पृथ्वीचा मृतदेह आढळला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, असे कारागृहातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून आम्ही शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. पृथ्वी याचा खून करण्यात आला आहे का यासह अन्य बाबींचा तपास केला जात आहे. कारागृहातील अन्य कैद्यांशी
त्याचे वैमनस्य होते का, याचाही तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जानेवारी ते एप्रिल २०१५ या कालावधीत तिहार कारागृहातील १५ कैद्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले, त्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला दिले. कारागृहावर दिल्ली सरकारचे प्रशासकीय नियंत्रण आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Inmate found dead in tihar jail