लखनऊ : महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू प्रकरणी सर्व पैलूंचा तपास करून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले. महंत नरेंद्र गिरी यांचा सोमवारी संशयास्पद मृत्यू झाला होता.

अलाहाबादमधील बाघांबरी मठ येथे ते मृतावस्थेत सापडले होते. ते अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. भारतातील साधूंशी संबंधित अशी ही सर्वांत मोठी संस्था आहे. अलाहाबाद विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व अलाहाबादचे पोलीस आयुक्त यांचे पथक महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी तपास करीत आहे, असे आदित्यनाथ यांनी अलाहाबाद येथे महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर वार्ताहरांना सांगितले.

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूबाबत पुरावे गोळा करण्यात आले असून या प्रकरणाची उकल लवकरात लवकर केली जाईल,  सर्व पैलूंचा तपास केला जाईल, दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल, असे आदित्यनाथ म्हणाले. यांनी म्हटले आहे. गिरी यांच्या अनुयायांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव मंगळवारी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. आदित्यनाथ यांनी सांगितले की, बुधवारी गिरी यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन पाच जणांचे पथक करील व त्यांच्या तपासणीचा अहवाल सादर करील. त्यानंतर त्यांच्यावर धार्मिक संस्कार करून समाधीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र गिरी यांचा मृतदेह छताला टांगलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती त्यांच्या शिष्यांनी सोमवारी दिली होती. त्यांच्या मृत्यूच्या ठिकाणी सात पानांची आत्महत्येची चिठ्ठी सापडली असून त्यात त्यांनी ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याने जीवन संपवल्याचे लिहिले होते. एका शिष्याबाबत आपण नाराज आहोत, असेही त्यांनी चिठ्ठीत लिहिले असल्याचे सांगण्यात आले.