कारगिल प्रकरण आणि पाकिस्तानचे माजी लष्करशहा मुशर्रफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९९ मध्ये केलेल्या लष्करी उठावाची चौकशी झालीच पाहिजे, असे मत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले आहे.
भ्रष्टाचाराला मुशर्रफ हेच जबाबदार असून त्यांच्या समर्थकांनीच त्यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब पेरले असल्याचा आरोपही आसिफ यांनी केला आहे. पाकिस्तानातील लष्करी उठावाबाबत मुशर्रफ यांच्यावर खटला नोंदविण्यात यावा का, असे विचारले असता आसिफ यांनी तसे आपले वैयक्तिक मत असल्याचे सांगितले.
मुशर्रफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९९९मध्ये पीएमएल-एनचे सरकार उलथून टाकले त्याविरुद्ध खटला दाखल करण्यात येण्याबरोबरच कारगिल प्रकरणाचीही चौकशी झालीच पाहिजे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
मुशर्रफ यांच्या निवासस्थानाबाहेर बॉम्ब मिळण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याबद्दल विचारले असता आसिफ म्हणाले की, मुशर्रफ यांच्याकडे अनेक स्रोत उपलब्ध आहेत आणि त्यांच्या समर्थकांचाच या प्रकारांमागे हात आहे.