‘आयएनएस सिंधुरक्षक’ पाणबुडीवर झालेल्या दुर्घटनंतर जवळपास १८ महिन्यांनी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल आर. के धोवान यांनी मानवी चुकांमुळे अशा घटना घडत असल्याची शक्यता फेटाळत येत नाही, याशिवाय त्याला इतर घटकही अशा दुर्घटनांना जबाबदार ठरू शकतात, असे बुधवारी स्पष्ट केले. ‘सिंधुरक्षक’वरील अपघातात १८ अधिकारी मृत्युमुखी पडले होते.
नौदल दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत धोवान बोलत होते. ते म्हणाले, पाणबुडय़ांवर जागोजागी धोका दबा धरून असतो. कारण पाणबुडय़ांवर स्फोटके, इंधन आणि भरपूर प्रमाणावर साधनसामग्री असते. अशा वातावरणात नियमांचे योग्य पालन केले गेले नाही, तर त्याठिकाणी चुकांना अजिबात वाव नसतो. परंतु जेव्हा कधी अशी चूक कुणाच्या हातून झालीच तर मग दुर्घटना घडलीच म्हणून समजा, म्हणूनच योग्य नियमावली पाळूनच अशा घटना टाळता येतील.
१४ ऑगस्ट २०१३ रोजी पाणबुडीवर अपघात झाला होता. गेल्याच महिन्यात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात ‘सिंधुरक्षक’वरील दुर्घटनेचा तपास अद्याप पूर्ण झाला नसल्याचे सांगितले होते.
यावर बोलताना धोवान म्हणाले की, चौकशी मंडळाची म्हणून एक विशिष्ट तपास पद्धती आहे. त्यामुळे पाणबुडी किंवा सामग्री, शस्त्रे तसेच स्फोटके हाताळताना नियमांची अमलबजावणी अत्यंत कोटकोरपणे पाळणे आवश्यक आहे. या सर्व बाजूंचा विचार करून मगच तपास अंतापर्यंत जाऊ शकतो. आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, हे फार ढोबळ पद्धतीने सांगता येणार नाही. आणि जर का तशी हाताळली गेली असेल तर भलतीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.