पीटीआय, विशाखापट्टणम
‘आयएनएस तारागिरी’च्या समावेशामुळे नौदलाची शक्ती, मूल्ये आणि बांधिलकी अधिक वाढेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी व्यक्त केला. स्वदेशी बनावटीची युद्धनौका ‘आयएनएस तारागिरी’ नौदलात दाखल करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. सागरी धोक्यांपासून व्यापारी जहाज मार्ग आणि तेल टँकर सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय नौदलाच्या अपरिहार्य भूमिकेवर सिंह यांनी या वेळी भर दिला.
देशाचा ९५ टक्के व्यापार, ज्यामध्ये ऊर्जा पुरवठ्याचाही समावेश आहे, तो समुद्राद्वारेच केला जातो. पर्शियन गल्फ असो वा मलाक्काची सामुद्रधुनी, भारतीय नौदल हिंदी महासागरात आपले अस्तित्व सातत्याने टिकवून आहे, असे सिंह यांनी सांगितले. संकटाच्या काळात आघाडीवर राहिल्याबद्दल सिंह यांनी नौदलाचे कौतुक केले. ‘जेव्हा जेव्हा संकट येते, नौदल नेहमीच आघाडीवर असते. मला वाटते की आपले नौदल हे भारताची मूल्ये आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ‘आयएनएस तारागिरी’च्या समावेशामुळे नौदलाची ताकद अधिक वाढेल, असा माझा विश्वास आहे.’
आधुनिक उपकरणांनी सज्ज
‘प्रोजेक्ट १७ए’ अंतर्गत चौथे प्लॅटफॉर्म असलेली ‘तारागिरी’ ही ६,६७० टनी युद्धनौका मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधली आहे. हे प्रगत डिझाइन आणि अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण असून, ही नौका ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांसह इतर आधुनिक उपकरणांनी सज्ज आहे. या युद्धनौकेची रचना अत्यंत सुटसुटीत असून तिचा ‘रडार क्रॉस-सेक्शन’ लक्षणीयरीत्या कमी आहे, ज्यामुळे ती शत्रूच्या रडारपासून स्वत:ला वाचवू शकते आणि कठीण सागरी वातावरणात अधिक सक्षमपणे टिकून राहू शकते.
