अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खास नौदलासाठी तयार केलेले तेजस हे लढाऊ विमान आयएनएस विक्रांत विमानवाहू नौकेवर यशस्वीपणे उतरले आणि एकाच वेळी भारताची विमानवाहू युद्धनौका व लढाऊ विमान निर्मितीचे कौशल्य अधिक दमदारपणे अधोरेखित झाले. याआधी रशियन बनावटीच्या आयएनएस विक्रमादित्यवर तेजसला उतरवण्याची चाचणी झालेली होती. परंतु, स्वदेशी विमानवाहू नौकेवर स्वदेशी तेजसच्या उतरण्याचे अनेक अर्थ आहेत. त्याचाच हा वेध…

चाचणी नेमकी काय होती?

आयएनएस विक्रांतवर तेजस हे लढाऊ विमान (एलसीए) यशस्वीपणे उतरविण्यात आले. युद्धनौकेवर स्थिर पंख असणारे विमान उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर मिग – २९ के विमानाची चाचणीही पार पडली. ही चाचणी लढाऊ विमानांची होती, तशीच नौकेवरील धावपट्टीशी संबंधित व्यवस्थेचीदेखील होती. विमानवाहू नौकेवर धावपट्टी लांबीने आखुड असते. त्यामुळे उड्डाणासाठी विशिष्ट रचना करावी लागते. वेगात परतणाऱ्या विमानांना सुरक्षितपणे उतरता यावे म्हणून धावपट्टीवर खास प्रणाली असते. या सर्वाचे मूल्यमापन या माध्यमातून करण्यात आले.

मैलाचा दगड कसा गाठला गेला?

या चाचणीनंतर नौदलाने आत्मनिर्भर भारतʼसाठी मैलाचा दगड गाठल्याची भावना व्यक्त केली. या निमित्ताने भारताची, स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानासह स्वदेशी विमानवाहू जहाजाची रचना, विकास, बांधणी आणि संचालन करण्याची क्षमता दर्शविली गेली. विक्रांतला पूर्ण क्षमतेने सुसज्ज करीत या वर्षात कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. ४४ हजार टन वजनाच्या नौकेत ७६ टक्के स्वदेशी सामग्री व उपकरणांचा समावेश आहे. अनेक आव्हानांवर मात करीत ती आकारास आली. या नौकेने विमानवाहू जहाजांची रचना आणि बांधणीची क्षमता असणाऱ्या जगातील काही मोजक्याच देशांच्या गटात भारताला स्थान मिळवून दिले. तेजस विमान संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले आहे. त्यातही सुमारे ७५ टक्के सामग्री स्वदेशी असून हे प्रमाण पुढील काळात आणखी वाढविले जाईल. नौदलासाठी तेजसची खास सुधारित आवृत्ती तयार करण्यात आली. शस्त्रास्त्रांचा जगातील सर्वात मोठा आयातदार म्हणून असणारी ओळख पुसण्यासाठीआत्मनिर्भर भारतʼ अंतर्गत स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. यातून लष्करी सामग्रीवरील परावंबित्व कमी करता येईल. देशांतर्गत निर्मिलेली विमानवाहू नौका आणि लढाऊ विमानांची क्षमता, त्यावरील प्रणालीची गुणवत्तेने ते साध्य होणार आहे.

विश्लेषण : फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?

नौकेवर विमान उतरण्याचे तंत्राचे महत्त्व काय?

लढाऊ विमानांना नौकेवर उड्डाणासह उतरण्यासाठी धावपट्टी अतिशय कमी असते. त्यामुळे ही प्रकिया सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कमी जागेत उड्डाण उतरताना शक्तिशाली लवचिक तारांनी (केबल) त्याला धावपट्टीवर रोखणे हे त्यातील एक तंत्र आहे. त्याला `अरेस्टेड लँडिंगʼ असे म्हटले जाते. शक्तिशाली तीन तारांचा संच असतो. त्यातील एक संच वेगात येणाऱ्या विमानात (हुक) अडकून त्याला धावपट्टीवर थांबवतो. तसे घडले नाही म्हणजे तारेचा एकही संच अडकला नाही तर विमानाला थेट पुन्हा आकाशात झेप घ्यावी लागते. विक्रांतवर तेजसच्या उतरण्याने अरेस्टेड लॅडिंगची चाचणी यशस्वीपणे पार पडली. विमानवाहू नौकेवर विमान उतरवण्याचे हे तंत्र विकसित करणारे मोजकेच देश आहेत. त्यात या निमित्ताने भारताचाही समावेश झाला. सर्वसाधारण तेजसला उड्डाण व उतरण्यासाठी एक किलोमीटरची धावपट्टी लागते. नौदलासाठी निर्मिलेल्या तेजसला उड्डाणासाठी २०० मीटर तर उतरण्यासाठी १०० मीटर धावपट्टीची गरज भासते.

विक्रांतसाठी लढाऊ विमानांचे नियोजन कसे आहे?

या नौकेवर साधारणत ३० हलकी विमाने, हेलिकॉप्टरचा ताफा तैनात असणार आहे. सध्या नौकेवर रशियन बनावटीचे मिग – २९ के आणि कामोव्ह – ३१ हेलिकॉप्टर, तसेच स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर कार्यरत राहतील. नव्याने २६ बहुद्देशीय लढाऊ विमाने खरेदीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. फ्रान्सचे राफेल-एम आणि अमेरिकेचे एफ – १८ यांच्या चाचणी झाल्या असून याबाबत लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. आयएनएस विक्रमादित्यवर तेजसच्या चाचण्या झाल्यानंतर डीआरडीओला विमानवाहू नौकेसाठी दुहेरी इंजिनच्या विमानाची गरज लक्षात आली. या निष्कर्षाच्या आधारे तसे लढाऊ विमान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या प्रकल्पाला मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची मान्यता मिळाल्यास २०३१-३३ पर्यंत ती लढाऊ विमाने नौदलात समाविष्ट होऊ शकतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ins vikrant warship tejas fighter get landing test successful print exp pmw
First published on: 08-02-2023 at 08:59 IST