Instagram Fake Bank Offer Fraud : इन्स्टाग्रामवर बँकेची ऑफर असल्याचे भासवणाऱ्या जाहिरातीवर क्लिक करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या जाहिरातीच्या माध्यमातून सुरू झालेल्या सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांनी तब्बल ५० मोबाईल फोन जप्त केले आहेत. त्यापैकी ४५ महागडे आणि नवीन स्मार्टफोन असून त्यांची एकूण किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. पश्चिम दिल्लीतील सायबर वेस्ट पोलीस ठाण्यात ७ ऑगस्ट रोजी एका व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. इन्स्टाग्रामवर बँकेशी संबंधित जाहिरात पाहिल्यानंतर त्याने त्यामध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला होता. याबाबत सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
व्हॉट्सॲपवर बँक अधिकारी बनून संपर्क
तक्रारदाराशी संपर्क साधल्यानंतर आरोपींनी व्हॉट्सॲपवरून बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून संवाद साधला. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांनी त्याला ‘ॲमेक्स इंडिया’ नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. या ॲपच्या माध्यमातून आरोपींनी त्याची वैयक्तिक माहिती आणि क्रेडिट कार्डशी संबंधित माहिती मिळवल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर त्याच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून अडीच लाख रुपयांहुन अधिक खरेदी करण्यात आली. या रकमेतून महागडे मोबाईल फोन खरेदी केल्याचे तपासात समोर आले.
पैशांचा माग काढताना बांगलादेश कनेक्शन
तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांचा माग काढताना पोलिसांना या रॅकेटचे बांगलादेशाशी संबंध असल्याचे आढळले. फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले मोबाईल लखनऊ, कोलकाता आणि धनबाद येथे पोहोचवण्यात आल्याचे तपासात समोर आले. बनावट सिम कार्डशी संबंधित काही कनेक्शन पश्चिम बंगालमधील २४ परगणा परिसरापर्यंत पोहोचले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी लखनऊमधील एका हॉटेलवर छापा टाकून २१ वर्षीय मोहम्मद राशिद नियाज ऊर्फ दानिश याला अटक केली. तो कोलकात्याचा रहिवासी असून त्याच्याकडून १९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. चौकशीत राशिदने दिलेल्या माहितीनुसार, तो आपल्या साथीदारासोबत इतर आरोपींच्या सांगण्यावरून नवीन मोबाईल फोन घेण्यासाठी कोलकात्याहून लखनऊला आला होता.
कोलकात्यातून आणखी ३१ मोबाईल जप्त
दिल्ली पोलिसांनी कोलकाता पोलिसांच्या मदतीने २९ वर्षीय मोहम्मद आसिफ याला कोलकात्यातून अटक केली. त्याच्याकडून आणखी ३१ नवीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. यामुळे जप्त करण्यात आलेल्या मोबाईलची संख्या ५० वर पोहोचली. यातील ४५ फोन नवीन आणि महागडे असून, त्यात आयफोनसह इतर प्रीमियम स्मार्टफोनचा समावेश आहे. या सर्वांची किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींकडून वापरण्यात आलेले पाच मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत. जप्त केलेल्या फोनमधील चॅट्स तपासल्यानंतर आरोपींचा परदेशातील कथित रॅकेट सदस्यांशी संपर्क असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सोशल मीडिया जाहिरातीद्वारे लक्ष्य करायचे
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हे रॅकेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील क्रेडिट कार्ड आणि बँक ऑफरच्या जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना लक्ष्य करत होते. जाहिरातीला प्रतिसाद देणाऱ्या व्यक्तींशी आरोपी संपर्क साधत आणि स्वतःला बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगत. त्यानंतर संवाद व्हॉट्सॲपवर नेऊन त्यांचा विश्वास संपादन केला जात असे.
पुढे आरोपी पीडितांना आर्थिक माहिती मिळवण्यासाठी बनावट ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडत. पीडित व्यक्तीला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवत असतानाच मिळवलेल्या कार्डच्या माहितीचा वापर करून महागडे मोबाईल खरेदी केले जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
खरेदी केलेले मोबाईल वेगवेगळ्या राज्यांमधून पुढे पाठवले जात होते. हे फोन कमिशनच्या बदल्यात बांगलादेशात पोहोचवले जात होते का, याचा तपास सध्या सुरू आहे.
दिल्ली पोलीस या प्रकरणात परदेशातील कनेक्शन, रॅकेटमधील इतर सदस्य आणि फसवणुकीच्या पैशातून खरेदी केलेले मोबाईल देशाबाहेर पाठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत.
