सोशल मीडियाचा वापर करताना जर तुम्ही अनोळखी तरुणींच्या मेसेजेसला बळी पडत असाल, तर सावधान! जामनगर पोलिसांनी एका अशाच भयंकर ‘हनीट्रॅप’ आणि खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. इन्स्टाग्रामवर प्रेमाचे नाटक करून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये लुटणाऱ्या या गँगच्या ५ सदस्यांना पोलिसांनी दमणमधून अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.

अशी रचली होती जाळी; थेट बाईकवरूनच केले अपहरण

या टोळीचा कारनामा तेव्हा उघडकीस आला, जेव्हा जामनगरमधील पंचेश्वर टॉवरजवळ राहणाऱ्या एका तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पूजा परमार नावाच्या एका तरुणीने इन्स्टाग्रामवर या तरुणाशी मैत्री केली आणि त्याला भेटायला बोलावले. तरुण आपल्या बाईकवरून ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. पूजा त्याच्या बाईकवर येऊन बसली आणि काही क्षणातच मागून एका बलेनो कारमधून टोळीचे इतर चार सदस्य तिथे आले. त्यांनी फिल्मी स्टाईलने त्या तरुणाचे अपहरण केले. त्याला एका निर्जन ठिकाणी नेऊन, सुऱ्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडील चांदीची चेन, लॉकेट आणि रोकड लुटली.

पोलिसांनी ‘असा’ लावला छडा

तरुणाच्या तक्रारीनंतर जामनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मोबाईल ट्रॅकिंग आणि गुप्तहेरांच्या मदतीने पोलिसांनी या टोळीचा शोध घेतला. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने दमण पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपी यश उर्फ आर्यन राठोड, पूजा परमार, मीत बारैया आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.

ब्लॅकमेलिंगचा भयंकर पॅटर्न

तपासात समोर आलेली या गँगची गुन्हे करण्याची पद्धत अंगावर काटा आणणारी आहे. आधी पूजा सोशल मीडियावर तरुणांशी जवळीक साधायची. नंतर त्यांना एकांतात भेटायला बोलवायची. तरुण येताच टोळीतील इतर सदस्य तिथे पोहोचून मारहाण करायचे आणि पीडित तरुणाचे पूजासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढायचे. हे व्हिडिओ घरच्यांना दाखवण्याची किंवा पोलिसात खोटी केस करण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी वसूल केली जायची. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने अनेक तरुण पोलिसांकडे जात नव्हते.

गेल्या अडीच वर्षांत अनेकांना बनवले शिकार

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत या टोळीने गेल्या अडीच वर्षांत अनेक तरुणांना लुटल्याचे समोर आले आहे. राजकोटचा निमिश याला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल १० लाख रुपयांना लुटले. श्याम नावाचा तरुण याच्याकडून ६ महिन्यांपूर्वी ३ तोळे सोन्याची साखळी हिसकावून घेतली.

राजकोटचा दुसरा तरुण जामनगरमधील एका फ्लॅटवर बोलावून त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवले आणि ४० हजार रुपये लुटले. मोर्बीचा तरुण याच्याकडून ५० हजार रुपयांची खंडणी वसूल केली. या गँगने एका तरुणाची बनावट लग्नाच्या नावाखाली २ लाखांची फसवणूक केली, तर पोरबंदरमधील एका मूकबधिर तरुणालाही ५० ते ६० हजारांना लुटले.

पुढील तपास सुरू

पोलिसांच्या अंदाजानुसार या गँगने जामनगर, राजकोट, मोर्बी आणि आसपासच्या परिसरात ७ पेक्षा जास्त लोकांना आपले शिकार बनवले आहे. पोलीस आता या रॅकेटमधील इतर सदस्यांचा आणि आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा शोध घेत आहेत.