गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील एका जंगल परिसरात एका तरुण जोडप्याने सोशल मीडियावर लाईव्ह येत टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या लाईव्हला सुमारे ५७ जणांनी पाहिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. लाईव्ह पाहणाऱ्यांमध्ये दोघांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. ही घटना ४ ऑक्टोबर रोजी सिंगवाड तालुक्यातील हिरापूर गावाच्या बाहेरील भागात घडली. मुलगी सुमारे १६ वर्षांची, तर तरुणाचं वय अंदाजे २३ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
२० किमी प्रवास करून जंगल परिसरात पोहोचले
पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही शेजारील तालुक्यातील आपापल्या गावांतून सुमारे २० किमी अंतर प्रवास करून हिरापूरजवळील जंगल परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह सुरु केलं. लाईव्ह सुरु असताना काही कुटुंबीयांना ही बाब लक्षात आली. परिस्थिती पाहून त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि पोलिसांना तातडीने माहिती दिली.
नेटवर्कच्या अडचणीमुळे शोधमोहीम कठीण
माहिती मिळताच पोलिसांनी पथक रवाना केलं. मात्र, मोबाइल नेटवर्कची समस्या आणि जोडपं नेमकं कुठे आहे, हे शोधण्यात आलेल्या अडचणींमुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांचं पथक तातडीने रवाना झालं होतं. मात्र, अचूक ठिकाण शोधण्यात अडचणी आल्याने पोलिस पोहोचेपर्यंत उशीर झाला.
कुटुंबीयांच्या विरोधामुळे टोकाचं पाऊल?
लिमखेडा विभागाचे सहाय्यक उपअधीक्षक पोलीस करण पन्ना यांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात दोघांच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध असल्याचं दिसून येत आहे. “प्राथमिकदृष्ट्या हा उत्स्फूर्त निर्णय असल्याचं दिसत आहे. त्यांच्या नात्याला कुटुंबीयांचा विरोध असल्याचे संकेत मिळत आहेत. तपास सुरू आहे,” असं पन्ना यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
लाईव्ह व्हिडीओ तपासाचा महत्त्वाचा भाग
या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ पोलिसांच्या तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. लाईव्ह पाहणाऱ्या काही सोशल मीडिया युजर्सनी तो रेकॉर्ड केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. रणधीकपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं आणि सोमवारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
