न्या. गांगुली यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविणार

प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप न्या. गांगुली यांनी फेटाळल्याने संतप्त झालेल्या न्या. गांगुली यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे तिने संकेत दिले आहेत.

प्रशिक्षणार्थी महिला वकिलाने केलेले लैंगिक शोषणाचे आरोप न्या. गांगुली यांनी फेटाळल्याने संतप्त झालेल्या न्या. गांगुली यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे तिने संकेत दिले आहेत. दरम्यान, सदर प्रशिक्षणार्थी वकिलाने आपल्या ब्लॉगवरून पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे संकेत दिले असले तरी त्याबाबत आपल्याला कोणतेही भाष्य करावयाचे नाही, असे न्या. गांगुली यांनी म्हटले आहे.
या प्रकाराबाबत जे अफवा पसरवत आहेत आणि त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांची कृती पूर्वग्रहदूषित आहे आणि ते पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे प्रशिक्षणार्थी वकिलाने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे.
न्या. गांगुली यांनी सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांना आठ पानांचे पत्र लिहून त्याद्वारे प्रशिक्षणार्थी वकिलाचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप फेटाळला आहे. आपण दिलेले निर्णय काही जणांच्या हिताला मारक ठरल्यानेच आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हे कुभांड रचण्यात आल्याचे न्या. गांगुली यांनी पत्रात म्हटले आहे. त्यानंतर प्रशिक्षणार्थी वकिलाने पोलीस तक्रारीचे संकेत दिले आहेत.
आपण केलेले दावे चुकीचे असल्याचे विधान कोणी करीत असल्यास तो केवळ आपलाच नाही तर सर्वोच्च न्यायालयाचाही अनादर करीत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाबाबत आपण सुरुवातीपासूनच जबाबदारीने वागत आहोत, असे प्रशिक्षणार्थी वकिलाने म्हटले आहे.
दरम्यान, नैतिकतेच्या दृष्टिकोनातून न्या. गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानव हक्क आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी तृणमूल काँग्रेसकडून त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात आहे. न्या. गांगुली यांनी सरन्यायाधीशांना पाठविलेल्या पत्रात काय म्हटले आहे त्याच्याशी आमचा संबंध नाही, आमची मागणी राजकीय नाही तर सभ्यपणासाठी आहे, असे तृणमूलचे खासदार सौगत रॉय यांनी म्हटले आहे.
न्या. गांगुली यांची पश्चिम बंगाल मानव हक्क आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी वकिलांच्या आणि माजी न्यायाधीशांच्या एका गटाने मंगळवारी निषेध मोर्चाही काढला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Intern hints at filing police complaint against justice ganguly

ताज्या बातम्या