पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये भरधाव बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोटारबसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात मर्दान जिल्ह्यातील स्वात भागात घडला. अपघातग्रस्त बस जनरेटरमध्ये बिघाड झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबली होती. ही बस स्वात खोऱ्याकडे जात होती. मृत व्यक्ती अप्पर दिर आणि बाजोर जिल्ह्यांतील रहिवासी होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बांगलादेशात ट्रक उलटून १५ मृत्युमुखी
ढाका : बांगलादेशातील जमुना पुलाच्या पूर्व बाजूला एका प्रमुख महामार्गावर सोमवारी पहाटे लोखंडी सळ्यांनी भरलेली एक ट्रक उलटल्याने किमान १५ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. असे स्थानिक अग्निशमन दलाच्या प्रभारी अधिकाऱ्याने पत्रकारांना सांगितले.
अपघातग्रस्त लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये काही प्रवासी होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. तो ट्रक चट्टोग्राम येथून निघाला होता. ईदच्या काळात, वाटेतील वेगवेगळ्या ठिकाणांवरून हे प्रवासी ट्रकमध्ये चढले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मृत पावलेल्या १५ जणांची ओळख त्वरित पटू शकली नाही; त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
फिलिपाइन्समध्ये इमारत कोसळून चौघांचा मृत्यू
अँजेल्स (फिलिपाइन्स) : उत्तर फिलिपाइन्समध्ये बांधकाम सुरू असताना कोसळलेल्या नऊ मजली हॉटेलमुळे चार कामगारांचा मृत्यू झाला असून अद्याप १७ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांपैकी बहुतांश जण कामगार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली. या कोसळेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आता प्रर्यंत चार जणांना बाहेर काठण्यात आले आहे, त्यापैकी तीन जणांचा ढिगाऱ्याखालीच मृत्यू झाला होता तर एकाचा बाहेर काढल्यानंतर मृत्यू झाला. अद्याप बेपत्ता असलेल्यांना शोधण्यासाठी मोहीम सुरू आसल्याचे आधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांपैकी एक जण पर्यटक असल्याचे सांगण्यत आले.
