उत्तर प्रदेश ‘एटीएस’ची कारवाई

देशातील लष्करी युनिट्सची हेरगिरी करण्यात गुंतलेल्या एका आंतरराष्ट्रीय  प्रकरणाचा छडा लावल्याचा दावा उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी केला.

समांतर दूरभाष केंद्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय कॉल रॅकेट चालवणाऱ्या ११ व्यक्तींना आम्ही मंगळवारी लखनौ, सीतापूर, हरदोई व नवी दिल्ली येथून अटक केली. लष्कराच्या जवानांना या केंद्रांमधून हेरगिरीसाठी फोन कॉल्स येत असल्याबाबत जम्मू- काश्मीरच्या लष्करी गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या संदर्भात गोमतीनगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून, या गुप्त कारवाईत वापरण्यात आलेले फार मोठय़ा संख्येतील सिमकार्ड, मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ही टोळी महत्त्वाचे लष्करी तळ, सैन्याच्या हालचाली व त्यांच्या तैनातीबद्दलची माहिती मिळवत होती. स्वत:ला सरकारी अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी विविध लष्करी ठाण्यांना दूरध्वनी केले आणि ‘डायरेक्ट इनवर्ड डायलिंग नेटवर्क’शी जोडलेल्या मोबाइल नंबरच्या आधारे ही हेरगिरी करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.

हे प्रकरण उघडकीला आल्यामुळे आता दहशतवादी किंवा कोणत्याही हेरांचे काम कठीण होणार आहे. याशिवाय अशा संशयास्पद दूरभाष केंद्रांमुळे होणारे कोटय़वधी रुपयांचे नुकसान टाळणेही शक्य होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. अशा केंद्रांमुळे विदेशात बसलेल्या लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून कॉल करण्याची सुविधा मिळते. हे कॉल्स नंतर सिमबॉक्समार्फत व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित होऊन भारतातील रिसिव्हर्सशी जोडले जातात.