आंतरराष्ट्रीय प्रवासविषयक निकष

ब्रिटन सरकारची सारवासारव

सर्व देशांच्या कोविड-१९ लस प्रमाणीकरणाने ‘किमान निकष’ पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच, आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवासविषयक निकषांबाबत आपण भारताबरोबर ‘टप्प्या-टप्प्याने’ चर्चा करत आहोत, अशी सारवासारव ब्रिटन सरकारने केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेका लशीचा बुधवारी ब्रिटनच्या प्रवासविषयक विस्तारित सूचनावलीत समावेश करण्यात आल्यानंतर सरकारने ही भूमिका घेतली आहे.

तथापि, भारताचे लस प्रमाणपत्र १८ मान्यताप्राप्त देशांच्या यादीत नसल्यामुळे, ब्रिटनला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना लसीकरण न झालेले मानले जाईल व त्यामुळे त्या देशात पोहचल्यानंतर १० दिवस विलगीकरणात राहावे लागेल.

या प्रक्रियेबाबत अतिशय संभ्रम निर्माण झाल्यामुळे, मान्यताप्राप्त देशांच्या यादीत बदल करणे ‘नियमितपणे विचाराधीन’ ठेवण्यात आले असल्याचे सरकारी सूत्रांनी बुधवारी सांगितले. मात्र, एखाद्या देशाच्या लस प्रमाणपत्राला मान्यता देण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांबाबत अद्याप पुरेशी स्पष्टता आलेली नाही.

सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे आणि सुरक्षित व कायमस्वरूपी रीतीने प्रवास पुन्हा सुरू करणे याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच सर्व देशांच्या लस प्रमाणीकरणाने सार्वजनिक आरोग्याचा विचार करून किमान निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत आमचा दृष्टिकोन टप्प्या-टप्प्याने स्पष्ट करण्यासाठी आम्ही भारतासह आमच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत काम करत आहोत, असे एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले.