नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आसाममध्ये हिंसक निदर्शने सुरूच आहेत. गुरुवारी गुवाहाटीत कथित पोलीस गोळीबारात दोन जण ठार झाले. निदर्शक आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यात रस्त्यांवर संघर्ष उफाळला असून, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरी समाजाचे नेते यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटवरुन आसाममधील नागरिकांना शांततेचे आवाहन केलं आहे. मात्र यावरुन काँग्रेसने मोदींनाच सुनावले आहे. आसाममध्ये इंटरनेट सेवा बंद असल्याने तेथील जनतेपर्यंत तुमचा आवाज पोहचणार नाही असा टोला काँग्रेसने लगावला आहे.

आसाममधील हिंसेच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आसामी आणि इंग्रजी भाषेमध्ये काही ट्विट केले होते. “मी स्वत: आणि केंद्र सरकार संविधानातील सहाव्या क्लॉजनुसार आसाममधील नागरिकांचे संविधानाने दिलेले राजकीय, भाषिक, संस्कृतीक आणि जमीनीसंदर्भातील हक्क अबाधित राखण्यासाठी कटीबद्ध आहोत,” असं मोदींनी ट्विट केलं होतं.

तसेच पुढच्या ट्विटमध्ये “नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे घाबरुन जाण्याची काहीही गरज नाही असं मला माझ्या आसाम आणि बंधू भगिनींना सांगायचं आहे. मी तुम्हाला आश्वस्त करु शकतो की तुमचे हक्क, ओळख आणि सुंदर संस्कृती तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ही संस्कृती कायम समृद्ध होत राहिल,” असं मोदी म्हणाले आहेत.

याच ट्विटवरुन काँग्रेसने मोदींना टोला लगावला आहे. आपल्या औपचारिक ट्विटर हॅण्डलवरुन मोदींचे हे ट्विट कोट करुन काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे. “आसाममधील आपले बंधू आणि भगिनी तुमचा हा ‘आश्वासक’ संदेश वाचू शकत नाही मोदीजी. जर तुम्हाला विसर पडला असेल तर आम्ही सांगू इच्छितो की त्यांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे,” असं ट्विट काँग्रेसने केलं आहे.

१२ तारखेपासून आसामधील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेतही आठ तासांच्या चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ तर, विरोधात १०५ मते पडली. या विधेयकामध्ये ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या बिगर मुस्लिम शरणार्थींना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना भारतीय नागरिकत्त्व या दुरुस्ती विधेयकामुळे मिळू शकतं. मात्र या विधेयकाला आसाम आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यातल्या नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याच दरम्यान आंदोलन सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला आहे.

लक्षवेधी घटना –

– गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना हटवण्यात आले आहे. मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी त्यांच्याजागी पदभार स्वीकारला आहे.

– धाकुआखाना, लखीमपूर जिल्ह्यात आंदोलकांनी भाजपा आणि आसाम गण परिषदेचे कार्यालय पेटवून दिले.

– हिंसक आंदोलनाचा ईशान्येकडच्या राज्यामधील हवाई आणि रेल्वे सेवेला फटका बसला आहे.

– आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसाम आणि अन्य ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत.

– त्रिपुरा आणि आसाममधील रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे.

– गुवाहाटीमध्ये अनेक नागरिकांनी संचारबंदी झुगारत रस्त्यावर उतरुन हिंसक आंदोलन केले. पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी गोळीबार करावा लागला. गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.