scorecardresearch

मोठी घडामोड! जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, कुपवाडामधील इंटरनेट सेवा बंद

बीएसएफचा एक अधिकारी शहीद

मोठी घडामोड! जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, कुपवाडामधील इंटरनेट सेवा बंद
संग्रहित (PTI)

जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्य्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय लष्कराने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय उत्तर काश्मीरमध्येही अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्याची माहिती मिळत आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. राकेश डोवल असं अधिकाऱ्याचं नाव आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान ते शहीद झाले. याशिवाय एक जवान कॉन्स्टेबल वासू राजा जखमी आहे. त्याचा हात आणि तोंड जखमी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

“कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याने सर्वोच्च बलिदान दिलं आहे. अधिकारी मूळचे उत्तराखंडचे रहिवासी होते,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान अद्यापही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून बीएसएफ त्यांना योग्य उत्तर देत असल्याची माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

बंदिपोरा जिल्ह्यात सर्वात प्रथम शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं. यानंतर काही मिनिटांनी कुपवाडामधील केरन सेक्टरमध्ये गोळीबार झाला. पाकिस्तान लष्कराकडून बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कर तिन्ही ठिकाणी योग्य प्रत्युत्तर देत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या